Slate Auto launches affordable EV Truck : मागील दशकभराच्या काळाचा आढावा घेतल्यास तंत्रज्ञान नेमकं किती पुढे आलं आहे याचा अगदी सहजपणे अंदाज लावता येतो. त्याच तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत संपूर्ण जगाला अवाक् करणारी कार नुकतीच लाँच करण्यात आली आहे. टोयोटा, मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू नव्हे, तर चक्क एका स्टार्टअप कंपनीनं हे अफलातून वाहन लाँच केलं असून, खुद्द जेफ बेजोस अर्थात अॅमेझॉनच्या मालकांनीसुद्धा यामध्ये गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे.
बेजोसच नव्हे, तर इतरही मोठ्या गुंतवणुकदारांनी या स्टार्टअप कंपनीत पैसा गुंतवल्याचं म्हटलं जात आहे. जास्तीचं सामान वाहून नेण्यासाठीचा स्टायलिश ट्रक ते एक कमाल कन्वर्टिबल एसयूव्ही असं या वाहनाचं डिझाईन असून स्लेट ऑटोचं हे प्रोडक्ट आहे. The Slate Auto ची ही ईव्ही सध्या अमेरिकेत लाँच करण्यात आली आहे.
कंपनीनं लाँच केलेलं डेब्यू मॉडेल हे कॉम्पॅक्ट दोन दरवाजे असणारं इलेक्ट्रीक पिकअप ट्रक म्हणून पाहताक्षणी लक्ष वेधतं. गरज भासल्यास या वाहनाला पाचजणांची आसनक्षमता असणाऱ्या एसयुव्हीमध्येही कन्वर्ट करता येतं. 15 फुटांहून कमी लांबी असणारा हा ट्रक/ एसयुव्ही Chevrolet Silverado EV च्या दोन तृतीयांश आकाराइतकी असल्याचं म्हटलं जातं. 1400 पाऊड इतकी या वाहनाची पेलोड क्षमता असल्याचं सांगण्यात येतं.
साधारण $25,000 इतक्या किमतीला अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असून या वाहनाचं बेस मॉडेल 241 किमी इतकी रेंज देतं. 52.7 kWh इतक्या बॅटरीसह येणारी ही कन्वर्टीबल एसयूव्ही 84.3 kWh त्या एक्सटेंडेड बॅटरीमध्येही उपलब्ध आहे. या वाहनात कस्टमायझेशनचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं ते खरेदीदारांना 100 अॅक्सेसरीजचा पर्यायही खुला आहे. कारसोबत 5000 डॉलरचा एसयूव्ही कन्वर्टीबल किट मिळत असून यामधघ्ये रिअर सीट, रोल केज आणि एअरबॅग्सचा समावेश आहे.
प्राथमिक स्वरुपात लाँच करण्यात आलेल्या या कारची उत्पादन प्रक्रिया संपूर्ण क्षमतेनं 2026 मध्ये सुरू होणार असून, ऑटोमोबाईल क्षेत्रात ही कार म्हणजे एक नवी क्रांतीच म्हटली जात आहे.