धोनी, विराट, अंबानींचे फोटो दाखवून पुणेकराला घातला 39 लाखांचा गंडा! विमान उडवण्याच्या…


Aviator Game Scam In Pune: पुण्यात सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड येथील 30 वर्षीय प्रतीक घुगे या तरुणाने ‘एव्हिएटर’ नावाच्या ऑनलाइन गेमच्या नादात तब्बल 39 लाख 77 हजार रुपये गमावले आहेत. विशेष म्हणजे, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ दाखवून तरुणाला या गेममध्ये गुंतविण्यात आले होते. विमान उडवण्याच्या एका विचित्र गेमच्या माध्मयातून या तरुणाला गंडा घालण्यात आला.

एव्हिएटर गेमशी संबंधित ही पुण्यातील पहिलीच मोठी फसवणूक

प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुण्यात एव्हिएटर गेमशी संबंधित ही पहिलीच मोठी फसवणूक असल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅपवर आली गेमसंदर्भातील लिंक

प्रतीक घुगेने दिलेल्या तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक अनोळखी लिंकसह गेमिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात आली. आकर्षक परताव्याच्या आमिषाने त्यांनी लिंकवर क्लिक करून खाते उघडले. सुरुवातीला त्याने 10 हजार रुपये गुंतवले, परंतु कोणताही नफा मिळाला नाही. त्यानंतर आणखी पैसे गुंतवत त्याने एकूण गुंतवणूक वाढवत नेली.

हळूहळू वाढवत नेली गुंतवणूक

प्रथम गुंतवणुकीनंतर काही अंशी परतावा मिळाल्याने त्याने 5 लाख 86 हजार रुपये गुंतवले, त्यावर फक्त 1 लाख रुपये परत मिळाले. पुन्हा प्रलोभनाच्या नादात, 5 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2024 दरम्यान त्याने 8 लाख 30 हजार रुपये गुंतवले, यावर फक्त 2 लाख रुपये परत मिळाले. तरीही आशेवर पाणी न सोडता त्यांनी 12 ते 19 डिसेंबर या आठवड्यात आणखी 12 लाख 83 हजार रुपये गुंतवले.अखेर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि गुंतवलेली रक्कम वाढल्याचे लक्षात आल्यावर, प्रतीकने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

एव्हिएटर गेम म्हणजे काय?

एव्हिएटर हा एक ऑनलाइन बेटिंग गेम आहे. यात स्क्रीनवर विमान उड्डाण करते आणि खेळाडूंना ते गायब होण्यापूर्वी आपली रक्कम काढावी लागते. जितके जास्त वेळ विमान हवेत राहील, तितका गुणक (Multiplier) वाढतो, आणि तितका परतावाही मोठा मिळतो. पण जर विमान गायब होण्याआधी पैसे काढले नाहीत, तर सर्व रक्कम गमवावी लागते. हा गेम मुद्दाम व्यसनाधीन होईल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेकजण झटपट पैसे कमावण्याच्या आशेने याच्या आहारी जातात.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *