Social Media Age Limit: सोशल मीडियामुळे माणसं एकमेकांच्या चांगली संपर्कात येऊ लागली आहेत. असं असलं तरी याचे दुष्परिणामही समोर येत असतात. विशेषत: लहान मुलांसाठी हा श्राप बनत चाललाय. मुलांचा तासन तास सोशल मीडियावर जातोय. तसेच वयाला साजेसा नसणारा कंटेट त्यांच्या फीडमध्ये येतोय. अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे लहान मुलांच्या सोशल मीडियावर वापरावर निर्बंध आणले जात आहेत. कोणत्या देशाने केलाय हा कायदा? काय आहेत फायदे? सविस्तर जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. 10 डिसेंबर 2025 पासून 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाती उघडण्यास पूर्णपणे बंदी आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, एक्स आणि यूट्यूबसह प्रमुख व्यासपीठांना आता अल्पवयीनांना प्रवेश देण्यास मनाई आहे. हा कायदा ‘ऑनलाइन सेफ्टी अॅमंडमेंट म्हणजेट सोशल मीडिया मिनिमम एज बिल 2024’ अंतर्गत लागू झालाय. हा कायदा आणून ऑस्ट्रेलिया जगातील पहिले राष्ट्र ठरलंय. जिथे मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी इतका कडक नियम करण्यात आलाय. हे उपाय मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक होते, असा सरकारचा युक्तिवाद आहे
पंतप्रधान काय म्हणाले?
पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी मंगळवारी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक विशेष व्हिडिओ जारी केला. आजची मुले सोशल मीडिया फीड, एल्गोरिदम आणि लाईक-कॉमेंट्सच्या दबावात वाढत आहेत, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.. सारख्या स्क्रोलिंगमुळे मुले व्यसनाधीन होत आहेत, असे ते म्हणाले. सुट्ट्यांमध्ये मोबाईलऐवजी नवीन छंद शिका – खेळ खेळा, वाद्य वाजवा, पुस्तके वाचा किंवा कुटुंब-मित्रांसोबत वेळ घालवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केलाय. हा कायदा मुलांना वास्तविक जीवनाकडे वळवण्यासाठी आहे, असा त्यांचा विश्वास आहे.
नियमांचे उल्लंघन आणि दंडाची तरतूद
सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांशी संवाद साधून अल्पवयीनांची खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 49.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंतचा भारी दंड आकारला जाणार आहेत. यात प्लॅटफॉर्म्सना कडक नियम आहेत पण मुलांवर किंवा पालकांवर कोणतीही शिक्षा नाही. जर एखाद्या मुलाने वय लपवून खाते उघडले तरी त्यांना काहीच होणार नाही. हा कायदा फक्त कंपन्यांवर केंद्रित आहे. यात तंत्रज्ञानाद्वारे वय तपासणी केली जाईल. यामुळे सुरुवातीला काही त्रुटी येऊ शकतात, पण सरकार त्यावर काम करत असल्याची माहिती देण्यात आली..
कोणत्या व्यासपीठांवर बंदी लागू ?
सरकारने 10 प्रमुख व्यासपीठांना नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. ज्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, थ्रेड्स, टिकटॉक, ट्विच, एक्स (ट्विटर), यूट्यूब, किक आणि रेडिट यांचा समावेश आहे. ही यादी गरजेनुसार वाढवली जाणार आहे. उदाहरणार्थ, रॉब्लॉक्स किंवा व्हॉट्सअॅपला यातून वगळण्यात आले आहे.कारवाई करण्यात आलेल्या 16 वर्षांखालील खाती बंद करावी लागतील आणि नवीन नोंदण्या रोखाव्या लागतील. कंपन्या वय सत्यापनासाठी चेहऱ्याची ओळख किंवा इतर तंत्र वापरतील. यामुळे लाखो अल्पवयीन खाती बंद होण्याची शक्यता आहे.
जनमत आणि कंपन्यांचा विरोध
अलीकडील सर्वेक्षणात 73 टक्के लोक या बंदीला पाठिंबा देत आहेत. पण हा उपाय यशस्वी होईल, असा विश्वास 26 टक्के लोकांना आहे. मुले तरीही सोशल मीडिया वापरण्याचा मार्ग शोधतील, असे 68 टक्के लोक म्हणतात. या निर्णयाला सोशल मीडिया कंपन्यांनी तीव्र विरोध केलाय. यामुळे मुले प्लॅटफॉर्म सोडून इंटरनेटच्या ब्लॅक कॉर्नरमध्ये जातील, जे अधिक धोकादायक ठरेल, असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे म्हणणे आहे. रेडिटने आपण कायद्याचे पालन करणार असल्याचे सांगितले. असे असले तरी त्यांनी यूजर्सची गोपनीयता आणि प्रभावावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतर देशांवर परिणाम?
ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाने जगभरातील लक्ष वेधले आहे. डेन्मार्क, मलेशिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि न्यूझीलंडसारखे देश अल्पवयीनांसाठी सोशल मीडिया वय मर्यादा निश्चित करण्याबाबत विचार करत आहेत. हा कायदा ‘जगातील पहिला डोमिनो’ म्हणून ओळखला जातोय. ज्यामुळे इतर राष्ट्रांना प्रेरणा मिळेल. मात्र काहींना यात मुले एकटे पडतील अशी भीती वाटते. तरीही मुलांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे, असे अभ्यासक सांगतात.
FAQ
१. प्रश्न: ऑस्ट्रेलियात आता मुलांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी कधीपासून बंद झाली?
उत्तर: १० डिसेंबर २०२५ (बुधवार) पासून १६ वर्षांखालील मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, एक्स, यूट्यूब आदी व्यासपीठांवर खाते उघडणे किंवा वापरणे पूर्णपणे बंद झाले आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आहे जिथे असा कडक कायदा लागू झाला.
२. प्रश्न: नियम मोडल्यास कोणाला शिक्षा होईल? मुलांना की पालकांना?
उत्तर: नाही! मुलांना किंवा पालकांना कोणतीही शिक्षा होणार नाही. जर मूल वय लपवून खाते उघडले तरी त्याच्यावर काहीच कारवाई नाही. शिक्षा फक्त सोशल मीडिया कंपन्यांना आहे. नियम न पाळल्यास त्यांना ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत दंड भरावा लागेल.
३. प्रश्न: पंतप्रधानांनी मुलांना नेमका काय संदेश दिला?
उत्तर: पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ जारी करून सांगितले की, सोशल मीडिया एल्गोरिदम, लाईक्स आणि अनंत स्क्रोलिंगमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यांनी सुट्टीत मोबाईलऐवजी खेळ खेळा, वाद्य शिका, पुस्तक वाचा आणि कुटुंब-मित्रांसोबत वेळ घालवा, असा सल्ला दिला.