Are We Getting Smarter with ChatGPT Or Just Lazier: क्लॉड शॅनन, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रारंभिक संशोधक, एकदा म्हणाले होते, “मला असा काळ दिसतो जेव्हा आपण रोबोट्ससाठी तेच असू जे कुत्रे मनुष्यांसाठी आहेत आणि मी मशीनच्या बाजूने आहे.” दशकांपूर्वी लिहिलेलं हे वाक्य आज लागू पडतं. आपण अशा काळात प्रवेश केला आहे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला फक्त मदत करत नाही तर आपल्याला मागे टाकत आहे. ChatGPT काही सेकंदांत निबंध, कविता, अगदी विनोदही लिहू शकतो; Google चा Veo फक्त मजकूर दिल्यावर सिनेमासारखा व्हिडीओ तयार करू शकतो आणि AI संशोधन साधने तुमच्या कॉफी थंड होण्याआधी संपूर्ण अहवाल तयार करू शकतात. हे आश्चर्यकारक आहे आणि थोडं भीतीदायकही. याबद्दल AI & Beyond चे को-फाउंडर, जसप्रीत बिंद्रा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
अभ्यासातून आली धक्कदायक माहिती समोर
MIT मीडिया लॅबच्या “Your Brain on ChatGPT” या अलीकडील अभ्यासाने ही भीती आणखी वाढवली. चार महिन्यांच्या या प्रयोगात 54 लोकांनी ChatGPT वापरून विना-ChatGPT निबंध लिहिण्याची तुलना केली. निष्कर्ष? ChatGPT वापरणाऱ्यांच्या मेंदूची क्रियाशीलता 55% पर्यंत कमी आढळली. त्याहूनही गंभीर म्हणजे AI चा वापर थांबल्यानंतरही त्यांचे मेंदू कमी सक्रिय दिसले. स्मरणशक्तीवरही परिणाम झाला जेमतेम 20% लोकांना त्यांनी लिहिलेलं आठवत होतं, आणि काहींनी तर आपणच ते लिहिलं होतं हेही नाकारलं! या अभ्यासाचं सार सोपं पण धक्कादायक होतं AI वर अवाजवी अवलंबून राहिल्यामुळे आपलं लिहिणं वेगवान होत असलं तरी विचार करण्याची क्षमता मंदावते.
हे पहिल्यांदाच घडत नाही. एकेकाळी आपण फोन नंबर पाठ ठेवत असू. आज आपल्यातील बहुतेक जण जवळच्या मित्राचा नंबरही आठवू शकत नाही. पूर्वी आपण दिशा शोधण्यासाठी नकाशे व खुणांचा आधार घेत असू; आज Google Maps शिवाय पाऊलही टाकत नाही. फेसबुक वाढदिवस आठवून ठेवतं, फोन वाक्यं पूर्ण करतात, आणि काही वर्षांत गाड्या आपल्याला स्वतःच घेऊन जातील आणि आपण फक्त स्क्रीनकडे स्क्रोल करत राहू.
सायकोलॉजिस्ट जोनाथन हाइट यांनी The Anxious Generation या पुस्तकात स्पष्ट केलं आहे की तंत्रज्ञान विशेषतः स्मार्टफोन मुलांचं बालपणच बदलून गेलं आहे. बाहेर खेळणं स्क्रोलिंगने बदललं आहे. मैत्री फक्त इमोजी आणि लाईक्समध्ये सीमित झाली आहे. चिंताग्रस्तता, एकटेपणा आणि लक्ष कमी होण्याची समस्या वाढत चालली आहे. कॅलक्युलेटरमुळे गणितातील कौशल्य कमी झालं, GPS मुळे दिशा ओळखण्याची क्षमता. प्रत्येक शोध मेंदूचा काहीसा भाग नव्यानं तारबद्ध करतो.
पण AI ला खलनायक ठरवण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तंत्रज्ञान आपल्याला मागे टाकत नाही, ते आपल्याला पुढे ढकलते. उदाहरण द्यायचं झालं तर, 1997 मध्ये संगणकाने गॅरी कास्पारोव्हचा पराभव केल्यानंतर अनेकांनी मानवी बुद्धिबळ संपलं असं गृहित धरलं. पण आजही जगभरातील लाखो लोक डी. गुकेश आणि मॅग्नस कार्लसन सारख्या मानवी बुद्धिबळ खेळाडूंची लढत पाहायला जमतात. का? कारण मानवी सर्जनशीलता, अंतर्ज्ञान आणि भावना अद्याप संगणक पुनरुत्पादित करू शकत नाही किमान सध्या तरी.
खरा धडा असा AI आपल्याला मूर्ख बनवत नाही; उलट ते आपल्याला अधिक शहाणं बनवू शकतं जर आपण त्याचा योग्य वापर शिकला तर. आपल्याला, आणि आपल्या मुलांना, AI सोबत विचार करायला शिकवणं महत्वाचं आहे AI मधून नाही. मशीन आपलं साधन असावं, गुरु नाही.
हो ChatGPT आपले निबंध लिहितो, प्रश्नांची उत्तरं देतो, मेल्स तयार करतो पण तो आपल्या स्वप्नांची निर्मिती करू शकत नाही.या काळातील खरा प्रश्न हा नाही की AI आपल्याला मागे टाकेल का. तर हा आहे AI शिवाय विचार करण्याची क्षमता आपण विसरू का?