Tata Punch Facelift 2026 : ऑटो (Auto News) जगतामध्ये भारतात मागील काही वर्षांमध्ये सामान्यांपासून धनिकांपर्यंत अनेकांच्याच पसंतीस उतरणाऱ्या टाटा कंपनीच्या अनेक कार लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. कंपनीबाबत असणारी विश्वासार्हता, उत्तम दर्जाच्या आणि सुरक्षिततेची हमी देणाऱ्या कार यामुळं अनेक वाहनप्रेमीची पसंती टाटाच्याच वाहनांना असते. अशी टाटा मोटर्स आता आत SUV Tata Punchचं एक नवं मॉडेल सादर करण्याची तयारी करत आहे.
साधारण 2026 पर्यंत कारचं हे मॉडेल वित्रीसाठी लाँच आणि विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतं. गेल्या काही महिन्यांपासून पंच फेसलिफ्टची चाचणी विविध स्तरांवर होत असून, हल्लीच ही कार पूर्णत: झाकलेल्या अवस्थेत रस्त्यांवर दिसली. सोशल मीडियावर या कारचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले, ज्यामध्ये टाटा पंचचं हे नवं मॉडेल असल्याचं स्पष्ट झालं. उपलब्ध माहितीनुसार कंपनीनं Punch EV प्रमाणंच या कारमध्ये काही महत्त्वाचे बदल केले असून, एक मॉडर्न टच दिला आहे.
कारमध्ये कोणते बदल अपेक्षित
नवी Punch Facelift नव्या लूकमध्ये सादर केली जाणार असून, तिची फ्रंट डिझाईन अर्थात पुढील बाजू बदललेली दिसू शकते. या कारमध्ये प्रथमदर्शनी हायटेक लायटिंग सेटअप देण्यात आल्यानं तिचा लूक आधीपेक्षा अधिक प्रिमीयर दिसतो. कारच्या वरील बाजूस LED DRLs आणि खालच्या बाजूला आकारानं लहान असणारे हॉरिजॉन्टल हेडलँप देण्यात आले आहेत. ग्रिल डिझाईन आणि लहान स्लेट या कारमध्ये पाहता येत आहेत. तर, खालच्या बाजूला आयताकृती लोअर ग्रिल असल्यानं ही एसयुव्ही अधिक रुंद आणि मजबूत भासते. या कारचं साईड प्रोफाईल मात्र फार बदलण्यात आलेलं नाही.
कारचे अंतरंग बदलणार…
प्राथमिक माहितीनुसार कंपनीकडून कारचं केबिन बदललं जाणार असून, यामध्ये महत्त्वाचा बदल असेल तो म्हणजे स्टीअरिंग व्हीलचा. 2 स्पोक स्टीअरिंग व्हील ही टाटाच्या एसयुव्हीची नवी ओळख या कारमध्ये पाहता येईल. याशिवाय 7 इंचांचं TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टर, नवं क्लायमेट कंट्रोल पॅनल, डॅशबोर्ड सेटअप यामध्येही काही बदल करण्यात येतील. कारच्या नव्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देण्यात येणार असून, याशिवाय ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, फ्रंट वेंटिलेटेड सीट असे अद्ययावत फिचर कारच्या सौंदर्यात भर टाकतील. कारमधील इन्फोटेन्मेंटमध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत.
पंच फेसलिफ्टमध्ये इंजिनचे फार बदल केलेले नसतील. या एसयुव्हीमध्ये आधीप्रमाणं 1.2 लीटर Revotron पेट्रोल इंजिन असून, त्यातून 87.8 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट होतो. याशिवाय 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी असे गिअरबॉक्सचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. कारच्या सीएनजी वर्जनमध्येही हेच इंजिन असेल. डिझाईन, फिचर आणि सुरक्षिततेच्या निकषांच्या बाबतीत ही कार एक मोठी अपडेट सादर करणार असल्यानं या एसयुव्हीचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही.