Auto News : अॅडवेंचर बाईकिंग आणि दूरवरच्या बाईक राईडवर जाणाऱ्या अनेकांसाठी एक कमाल बाईक भारतात लाँच झाली असून, ही बाईक चक्क बुलेटलाही टक्कर देईल असं म्हटलं जात आहे. दुचाकीस्वारांच्या वर्तुळात चर्चेत आलेली हे नवं व्हेरिएंट आहे ते म्हणजे बजाज ऑटोचं Dominar 400.
कंपनीनं नुकतंच या बाईकचं अपडेटेड 2025 मॉडेल लाँच केलं असून, पॉवर, स्टाईल आणि फिचर्सची अद्वितीय सांगड या बाईकमध्ये पाहायला मिळेल. नव्या बदलांसह लाँच झालेलं हे मॉडेल वाढीव किमतीत येईल अशी अनेकांनाच अपेक्षा असताना त्यात फक्त 6026 रुपये इतकीच किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीकडून तूर्तास बाईकमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि डिझाईन अपग्रेडसुद्धा सादर केले आहेत.
स्मार्टफोन कनेक्टीव्हिटी आणि डिजिटल डिस्प्ले
Bajaj Dominar 400 करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे या बाईकमध्ये देण्यात आलेलं डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर. आता हा डिस्प्ले Pulsar NS400Z प्रमाणं स्प्लिट डिजाइन आणि डॉट मॅट्रिक्स इनसेट फॉरमॅटमध्ये येत असून, याच्या मदतीनं रायडर्सना टर्न-बाय-टर्न नेविगेशन, कॉल अलर्ट आणि SMS अलर्ट सारख्या सुविधा उपब्ध असतील.
Dominar 400 चं नवं मॉडेल राइड-बाय-वायर थ्रॉटल तंत्रज्ञानासह सादर करण्यात आलं असून, या फिचरसह बाईकमध्ये रायडिंग मोड्स Rain, Road, Sport आणि ऑफ रोड देण्यात आले आहेत. पॉवर डिलिवरी आणि एबीएस सिस्टीमला विविध परिस्थितीनुसार हे मोड्स नियंत्रित करतात. महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट आणि ऑफरोड मोडमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम पूर्णपणे बंद करता येतं, ज्यामुळं बाईक रायडिंगचा थरारक अनुभव आणखी द्विगुणित होतो.
इंजिन आणि इतर फिचरही पाहूनच घ्या…
डॉमिनरच्या या बाईकला 373.5cc चं लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं असून, आता हे इंजिन नव्या OBD-2B एमिशन नॉर्म्सनुसार अपडेटही करण्यात आलं आहे. या इंजिनमधून 40PS ची पॉवर आणि 35Nm चा टॉर्क जनरेट होतो. कंपनीकडून 2025 मॉडेलमध्ये Bajaj नं Canyon Red मध्ये पुन्हा सादर केलं असून तरुणाईकडून नया बाईकला चांगली पसंती मिळताना दिसत आहे. या बाईकचा ऑन रोड दर ₹ 2,89,718 असून त्यात काही हजारांची वाढ झाली असली तरीसुद्धा त्याच मिळणारे फिचर पाहता ही बाईक रायडिंगची आवड असणाऱ्यांसाठी एक पैसा वसूल पर्याय असेल असं म्हणायला हरकत नाही.