दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढले. या कुटुंबातील चारही मुली अपंग होत्या आणि त्यांना चालता येत नव्हते, त्यामुळे त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचे वडील पूर्णपणे हताश झाले होते. याच निराशेतून त्यांनी मुलींना विषारी औषध खायला घातले आणि स्वतःही आत्महत्या केली. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
हिरालाल (वय ५०) असे त्या वडिलांचे नाव आहे, तर नीतू (वय १८), निशी (वय १५), नीरू (वय १०), आणि निधी (वय ८) अशी त्या चार मृत मुलींची नावे आहेत. हिरालाल हे मूळचे बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मसरख गावाचे रहिवासी होते आणि त्यांनी वसंतकुंज येथील एका रुग्णालयात सुताराचे काम करीत होते. त्यांची पत्नी सुनीता कर्करोगाने ग्रस्त होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचं पहिली मुलगी अपंग जन्माला आली, पण पुढील तीन मुली देखील अपंग झाल्या. हिरालाल स्वतःच आपल्या मुलींची काळजी घेत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी सांगितले की, बरेच दिवसांपासून हे कुटुंब दिसले नव्हते. जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा आतून शरीर कुजल्याचा वास येत होता. पहिल्या खोलीत हिरालालचा मृतदेह आढळला, तर दुसऱ्या खोलीत चारही मुलींचे मृतदेह होते. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली नसली तरी या घटनेमागील प्रमुख कारण मुलींचे अपंगत्व असल्याचे मानले जात आहे.
हिरालाल यांची पत्नी कर्करोगामुळे मृत्युमुखी पडल्याने ते आधीच मानसिक तणावात होते. चार अपंग मुलींची काळजी घेताना आणि काम करताना त्यांच्यावर खूप ताण आला होता. दिवसभर रुग्णालयात सुतारीकाम करून घरी परत आल्यावर ते मुलींसाठी जेवण बनवत आणि घर स्वच्छ करत असत. या ताणतणावामुळे ते नैराश्यात गेले असावेत. त्यांचा धाकटा भाऊ जोगिंदर आणि मेहुणी गुडिया यांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी पोलिसांनी गुडिया, घरमालक, आणि इमारतीच्या केअरटेकरसह सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. हिरालालचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. ही घटना तीन दिवसांपूर्वीची असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे, कारण मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.