”लालबागचा राजा’ गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव…’; अमित शाहांचा उल्लेख करत विधान

Ganesh Utsav 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा त्याचबरोबर लालबागचा राजा गणपती मंडळामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्रीत जाणार आहेत. मात्र आता याच दौऱ्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये अमित शाहांवर निशाणा साधला आहे.

कमजोर गृहमंत्री

“अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांना मुंबईत येण्यासाठी त्यांना परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आमचा अमित शाहांना विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीचं दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला,” असं अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबद्दल राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच, “मुंबई महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, रोजगाराबरोबरच अनेक महत्त्वाची केंद्रं गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शाहांबद्दल महाराष्ट्राच्या भावना तिव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत. पण ते कमजोर गृहमंत्री आहेत,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

महाराष्ट्र अधिक कमजोर केला

 “महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जम्म-ूकाश्मीर असेल मणिपूर असेल किंवा इतर भागांचाही विचार केला तर या गृहमंत्र्यांचं देशाच्या सुरक्षेकडे अजिताब लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लुटमारील पाठिंबा देतात. मुंबईला लुटलं. लुटमार करणाऱ्यांना पाठिंबा देतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडले. महाराष्ट्र अधिक कमजोर केला. अशी काम त्यांनी केली. ही गृहमंत्र्यांची कामं नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रात, मुंबईत येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांनी शत्रू मानते,” अशी टीका राऊत यांनी केली. 

लालबागचा राजा गुजरातला घेऊन चला

तसेच, अमित शाह लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये जाऊन गणरायाचं दर्शन घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवरही राऊतांनी टोला लगावला. “लालबागचा राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊ द्या! मला तर सारखी भिती वाटते. ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का? होऊ शकतं. हे लोक काहीही करु शकतात. लालबागचा राजा एवढं मोठं नाव आहे, लोक देशभरातून येतात चला गुजरातला घेऊन चला. दबाव निर्माण करा. ते काहीही करु शकतात. लालबागचा राजा गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्तावही देऊ शकतात. लालबागचा राजा उद्यापासून गुजरातमध्ये पाहिजे, असं म्हणतील. हे व्यापारी लोक आहेत. मी सांगतोय तुम्हाला आणि फार विचार करुन सांगतोय,” असं राऊत म्हणाले. 

…म्हणून विधानसभा जाहीर करत नाहीत

महाराष्ट्राचा स्वाभिमान सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत असल्याची टीका राऊत यांनी केली. “भाजपाच्या लोकांना अनेक राज्य लुटायची आहेत. गृहमंत्र्याचं काम आहे सर्व राज्यांना समान न्याय देणे. कायदा, सुव्यवस्था कायम राखणे हे त्यांचं काम आहे. मात्र पक्ष फोडण्याचं त्यांचं काम नाही. न्यायालयावर दबाव टाका, निवडणुक आयोगावर दबाव टाका हेच काम देशाचे गृहमंत्री करत आहेत. इतिहासात याची नोंद राहील. महाराष्ट्राची प्रगती, स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतोय. जसे निकाल लोकसभेला आलेत ते पाहून त्यांना महाराष्ट्र कमजोर करायचा असल्याने ते निवडणुका जाहीर करत नाहीत,” असं राऊत म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24