महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला तर पुढे काय करायचे? या मुद्यावर माओवाद्यांची नेपाळची राजधानी काठमांडू येथे एक बैठक झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शहरी नक्षलवादाचा पुन्हा ए
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी माओवाद्यांच्या काठमांडूत झालेल्या एका बैठकीचाही उल्लेख केला होता. ‘एबीपी माझा’ने आपल्या एका वृत्तात आपल्या हाती या बैठकीचा तपशील लागल्याचा दावा केला आहे. या वृत्तानुसार, गत 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान माओवाद्यांची काठमांडू येथील कांतीपूर येथे एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आले तर त्याला अस्थिर करण्याच्या मुद्यावर धीरगंभीर चर्चा झाली होती. या बैठकीला माओवाद्यांचे भारतासह नेपाळ व बांगलादेशातील सदस्यही हजर होते.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सदर बैठक माओवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॉप कमांडर्ससाठीची होती. त्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीच्या भारत, नेपाळ, बांगलादेश व मणिपूर येथील काही निवडक कॉम्र्डेस सहभागी झाले होते.
बैठकीत कोणते निर्देश देण्यात आले?
- पहिल्या टप्प्यात प्रसारमाध्यमे व सोशल मीडियातून ईव्हीएमविरोधात जोरदार आरोप करत राज्यात संशयाचे वातावरण निर्माण करणे.
- दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमविरोधात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील इतर राज्यांतही आवाज बुलंद करून निवडणुका ईव्हीएमद्वारे नव्हे तर मतपत्रिकेद्वारे घेण्यासाठी आंदोलन उभे करणे.
- महाराष्ट्रातील महायुती सरकारवर नाराज असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना विशेषतः मुस्लिम, दलित व ओबीसीतील काही विशिष्ट घटकांना रस्त्यावर उतरवून सरकार विरोधात वातावरण तयार करणे.
- चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकाची स्थिती निर्माण झाल्याचा दावा करत विद्यमान सरकारविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई (हिंसक आंदोलक) उभे करणे.
गंभीर बाब म्हणजे काँग्रेस व राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाशी संबंधित असणारे व नंतर विधानसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा देत ठिकठिकाणी व्याख्यान देणारे एक बुद्धिजिवी यांच्यासह महाराष्ट्रातील 4 ते 5 जम माओवाद्यांच्या कथित बैठकीला हजर असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
आता पाहू काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस या घटनाक्रमाची माहिती देत म्हणाले होते, 15 नोव्हेंबरला नेपाळची राजधानी काठमांडू येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात अशा संघटना सहभागी झाल्या होत्या, ज्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. सदर बैठकीत ईव्हीएम विरोध व महाराष्ट्रातील महायुती सरकारविरोधात कट रचला गेला. भारत जोडो यात्रेतील 180 पैकी 40 संघटनांना काँग्रेसच्या काळात फ्रंटल संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते.
या संघटना महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी प्रचार करत होत्या. मी विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करत नाही, पण तुमचा खांदा तुम्ही कोणाला देत आहात? याचा विचार करण्याची गरज आहे. सरकार येईल-जाईल, पण हा देश राहिला पाहिजे.
संजय राऊत यांचा पलटवार
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला होता. नेपाळ, काठमांडूचे कौतुक भाजपा व संघाला खूप होते. त्यामुळे तुम्ही ते वाचण्याची गरज होती. नेपाळसोबत आपले भावनिक आणि धार्मिक संबंध आहेत. त्याठिकाणी चीन किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल त्याला जबाबदार मागील 10 वर्षातील मोदी सरकारचे धोरण आहे. नेपाळसारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तर हे तुमचे अपयश आहे. तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला म्हणजे चीनचा प्रभाव वाढला. या प्रकरणी आपले विश्वगुरू काय करत आहेत? असा सवाल राऊतांनी या प्रकरणी उपस्थित केला.
मी स्वत: राहुल गांधी यांच्यासोबत 28 किमीपर्यंत चाललो. मी शहरी नक्षलवादी आहे का? हे फडणवीसांनी सांगावे. पुण्यातून अमोल पालेकर यात्रेत सहभागी झाले होते. मग ते ही शहरी नक्षलवादी झाले का? हातात सत्ता आहे म्हणून काहीही तोंडाला येते ते बोलता. कुठे आहे शहरी नक्षलवाद? आम्ही नक्षलवाद संपवला असा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला. आता त्यांनाच तुम्ही आव्हान देत आहात. समाजातील सर्वच घटक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. ते सर्वजण आता शहरी नक्षलवादी झाले का? असा सवालही राऊतांनी या प्रकरणी फडणवीस यांना विचारला.