राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी हा प्रश्न मंत्रिपदाचा नव्हे तर आपल्या अस्मितेचा असल्याचे नमूद करत थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पत्रकारांनी गुरुवारी याविषयी राष्ट्र
.
राज्य मंत्रिमंडळाचा गत रविवारी विस्तार झाला. त्यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी दिली नाही. यामुळे ते चांगलेच नाराज झालेत. त्यांनी या प्रकरणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. विशेषतः त्यांनी यासंबंधी थेट अजित पवारांवर निशाणा साधल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
पत्रकारांनी शरद पवारांना विचारला प्रश्न
पत्रकारांनी गुरुवारी छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी शरद पवारांना छेडले. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज झालेत. त्यांच्या मते, शरद पवारांनी मला सन्मान दिला, पण आता तो सन्मान मिळत नाही, याविषयी तुम्ही काय म्हणाल? असे पत्रकार म्हणाले. त्यावर बोलताना शरद पवारांनी ‘ते सगळे तुम्ही त्यांनाच विचारा, मला काय माहिती?’, असे एका वाक्यात उत्तर दिले व हा विषय संपवला.
सुप्रिया सुळेंनी काढला चिमटा
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी भुजबळांचा चिमटा काढला. छगन भुजबळ आमच्यासोबत होते तेव्हा कायमच मान सन्मान देण्यात आला. त्यांची खुर्ची शरद पवार यांच्या शेजारीच असायची. आता त्यांची जी काही नाराजी आहे, तो सर्व विषय त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय आहे, असे त्या म्हणाल्या.
छगन भुजबळांनी साधला होता अजित पवारांवर निशाणा
छगन भुजबळांनी बुधवारी मंत्रिपद नाकारल्याप्रकरणी थेट अजित पवारांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रफुल पटेल यांनी पराकाष्ठा केली. सुनील तटकरेंनीही केली. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला. ते सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. हे चुकीचे आहे असे करू नका असे ते म्हणाले. पण शेवटी मला घेतलेच नाही. आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असे काही नाही. कोणत्याही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो.
भुजबळ पुढे म्हणाले, हा माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? हा खरा प्रश्न आहे. मंत्रिपदे किती वेळा आली आणि गेलीत. विरोधी पक्षातही बसावे लागले, पण त्याचे दु:ख नाही. ओबीसींनी महायुती सरकार आणले मग असे का? यामागचा हेतू काय? असा प्रश्न आहे. मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू, पण थेट अवहेलना करण्याचे शल्य मनात डाचत आहे, असे ते म्हणाले होते.