सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने १ लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. सुरुवातीपासूनच नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या या योजनेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याचे हे द्योतक आहे. नागरिकांच्या विनंतीस मान
.
अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. तसेच एक लाख अर्जांचा टप्पा म्हणजे, सिडकोच्या गृहनिर्माण क्षेत्रातील योगदानाचा व विश्वसार्हतेचा जनतेने केलेला गौरव असल्याची प्रतिक्रियाही सिडकोने दिली आहे.
सिडकोतर्फे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंअंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे व परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी नागरिकांना या योजनेद्वारे लाभली आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट शिथील
अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता यावा व अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी याकरिता योजनेच्या अर्ज नोंदणीस २६ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि १०० किंवा ५०० रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या पूर्वीच शिथील करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांना सुरळीतपणे नोंदणी करता आली.
नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
आता या योजनेची इकेवायसी नोंदणी दिनांक २६ डिसेंबर २०२४ पर्यंत करता येईल. यासाठी सिडकोतर्फे cidcohomes.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नोंदणी प्रक्रिया तथा योजनेविषयी अतिरिक्त माहिती प्राप्त करण्यासाठी ९९३०८७०००० हा संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून देखील वेळोवेळी सदर योजनेची अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जाते.