महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कनिष्ठ म्हणून काम करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वृत्तांत शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस
.
देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यामुळे तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झाले आहे. पण आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुढील भूमिका काय असणार? ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये सक्रिय राहणार का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारमध्ये सक्रिय राहण्याचे आवाहन केले आहे.
शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावे ही आमची स्पष्ट भूमिका
उदय सामंत म्हणाले, काल आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. तद्नंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. अखेर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातही चर्चा झाली. आता आम्हा सर्वांची इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकारमध्ये नेतृत्व करावे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
शिवसैनिक म्हणून आम्हाला आमची भूमिका आमच्या नेत्यापुढे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी हा आग्रह केला आहे. शिंदे यांनी यापूर्वीच मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रात संघटनेचे काम करेल हे सांगितले आहे. पण आम्हाला फक्त तेवढेच नको आहे. त्यांनी प्रशासनात यावे. त्यांच्या नेतृत्वात ज्या योजना राबवण्यात येत आहे, त्या पूर्ण कराव्यात. त्यांच्यामुळे सरकार येण्यास ताकद मिळाली आहे.
खाली पाहा पक्षीय बलाबल
- भाजपा- 132
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जन सुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
- अपक्ष- 2