राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सोमवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते तसेच सत्ता स्थापनेपूर्वीच ही भेट घेतल्याने अ
.
सोमवारी दुपारच्या सुमारास खासदार सुरेश म्हात्रे हे अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्यासोबत सागर बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली व त्यानंतर सुरेश म्हात्रे निघून गेले. मात्र, ही भेट झाल्याने सुरेश म्हात्रे अर्थातच बाळ्यामामा शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी मी व्यक्तिगत भेटण्यासाठी गेलो होतो, असे सुरेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
सुरेश म्हात्रे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मी व्यक्तिगत कामासाठी भेटलो. राजकीय काहीही विषय नव्हता. मी शरद पवारांसोबतच आहे. दुपारी दोन वाजता राजकीय भेट घेण्यासाठी कोणी जाते का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला. त्यांनी या दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाले आहे.
पुढे बोलताना सुरेश म्हात्रे म्हणाले, मी शरद पवारांची साथ सोडणार वगैरे सगळे तर्क माध्यमांनी लावले आहेत. एकमेकांना भेटलो की तेव्हा फक्त राजकारणच होते असे नाही. मी खासदार आहे, आमदारही नाही. तसेच शरद पवारांची साथ सोडण्याचा काही प्रश्नच येत नाही, असेही सुरेश म्हात्रे म्हणाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला आहे. आता महायुतीचे सरकार स्थापन करण्याची लगबग सुरू आहे. तसेच महाराष्ट्रात नवीन समीकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.