मुंबई ही सर्वांचीच आहे, पण सर्वात पहिला ती मराठी माणसाची आहे. त्यामुळे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या गिरगाव येथील झालेल्या प्रकरणानंतर लोढा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे
.
मुंबई भाजपची आणि मुंबई मारवाडीची असे म्हणत एका मारवाडी दुकानदाराने मराठी महिलेला मारवाडी भाषेत बोलण्याची सक्ती केल्याची घटना गिरगाव इथे घडली होती. या घटनेनंतर या महिलेने भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, लोढा यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे या महिलेने म्हंटले होते. तसेच या महिलेने मनसेकडे याप्रकरणी तक्रार केली होती. मनसैनिकांनी या दुकानदाराला चांगलाच चोप देत महिलेची माफी मागायला भाग पाडले होते.
मंगलप्रभात लोढा यांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानंतर त्यांनी एक्सवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मंगलप्रभात लोढा म्हणाले, गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे! त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाही! आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी जाहीर निषेध केला आहे.
काय होती महिलेची तक्रार? महिलेच्या म्हणण्यानुसार, सोमवारी या व्यक्तीच्या दुकानात गेले तेव्हा मी बोलत असताना हा म्हणतो की मारवाडीमध्ये बोला. आता भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे मारवाडीमध्ये बोलायचे, मराठीत नाही बोलायचे. मुंबई भाजपची, मुंबई मारवाडीची, असे उद्धटपणे या दुकानदाराने म्हंटले. तसेच पुढे बोलताना त्या महिला म्हणल्या की, मी याबाबत भाजप नेते लोढा साहेबांकडे गेले होते, तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही आमच्यात भांडणे लावत आहात. आम्ही या लोढा साहेबांना आम्ही पाठिंबा दिला, दक्षिण मुंबईमध्ये आम्ही त्यांना निवडून दिले आणि ते मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही. तुम्ही आमदार आहात तरी तुम्हाला ओळखच पाहिजे का? त्यामुळे आता मला आणि सगळ्या मराठी बंधू व भगिनींना न्याय पाहिजे, अशी मागणी देखील यांनी केली आहे.