महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घ
.
एकीकडे मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत. भाजपपुढे ओबीसी समुदायाचे मतही विचारात घ्यावे लागणार आहे. चला तर मग पाहूया महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे घोडे नेमके कुठे अडले?
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा राज्यशकट हाकतील.
भाजपचे पर्यवेक्षक सहकारी पक्षांना घेणार विश्वासात
नव्या मुख्यमंत्र्याचा निर्णय घेण्यापूर्वी भाजप आपल्या मित्रपक्षांसह आमदारांचे मत जाणून घेणार आहे. पक्षाचे निरीक्षक लवकरच मुंबईत पोहोचतील. ते तिथे प्रथम मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतील. त्यानंतर ते भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होऊन ते आपल्या आमदारांशी सल्लामसलत करतील त्यानंतर महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजपने अद्याप महायुतीमधील कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार? हे स्पष्ट केले नाही.
भाजपच्या नेतृत्वाची नेमकी काय इच्छा?
सूत्रांच्या मते, भाजपला महाराष्ट्रात मोठा विजय मिळाला. त्यामुळे राज्यात आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड करताना कार्यकर्त्यांची भावना विचारात घेण्याची गरज भाजप नेतृत्वाने व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? हे ठरवण्यात कोणताही वाद नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांना कोणते मंत्रिपद द्यायचे? यावर अद्याप निर्णय झाला नाही.
एकनाथ शिंदेंना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न
भाजप यासंबंधी योग्य समन्वयाशिवाय कोणताही निर्णय होणार नाही याची काळजी घेत आहे. यामुळे गत 4 दिवसांपासून त्यांची महायुतीच्या घटकपक्षांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदे व त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संतुष्ट करण्याचे मोठे आव्हान होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांना आपली पहिली पसंती असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
आता पाहू भाजपच्या मार्गातील अडथळे कोणते?
- दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर या निवडणुकीत खरी कसोटी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाची होती. त्यात हे दोन्ही पक्ष उत्तीर्ण झाले आहेत. दोघांनी बंपर विजय मिळवत आपापले गड राखले. भाजपलाही या दोन पक्षांची सुसंगतता अधिक चांगली समजते. त्याची या पक्षांसोबत कोणताही नवा वाद निर्माण करण्याची इच्छा नाही. कारण, मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे.
- राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाची लढाई सुरू असताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेतली होती. विशेषतः शिंदे हे स्वत: महायुतीतील मोठा मराठा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाजाने महायुतीच्या समर्थनार्थ भरभरून मतदान केले. निवडणुकीच्या तोंडावर या आंदोलनामुळे महायुतीपुढे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुअळे एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बाजूला सारणे भाजपसाठी सोपी गोष्ट नाही.
- महाराष्ट्राचे राजकारण मराठा समाजाभोवती फिरते. आतापर्यंत राज्यातील 18 मुख्यमंत्र्यांपैकी 10 मराठा आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 व लोकसभेच्या 48 जागा आहेत. विधानसभेच्या 150 हून अधिक जागा आणि लोकसभेच्या 25 जागांवर मराठा समाजाची पकड आहे.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पण उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यामुळे त्याला सत्तेत येता आले नाही. पण, अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे एनडीएचे सरकार स्थापन झाले. याचा अर्थ शिंदे यांच्यामुळेच 2022 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार आले.
- 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2022 मध्येही सर्वात मोठा पक्ष होता. पण, त्यावेळी भाजपला सत्तेत येण्यासाठी तडजोड करावी लागली होती. यासाठी त्यांनी आपला सर्वात मोठा चेहरा असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मागे बसवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. आजही तीच परिस्थिती आहे. भाजपने आपला मुख्यमंत्री केल्यास 2022 च्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होतील आणि राष्ट्रीय स्तरावर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
- एकनाथ शिंदे गट यावेळी बिहार मॉडेलचा हवाला देत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. पण त्यानंतरही त्यांनी जदयु अध्यक्ष नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. 2025 च्या निवडणुकीतही नितीश कुमार एनडीएचा चेहरा असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढली. त्यांच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला विक्रमी विजय मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांनाच द्यावे असा युक्तिवाद शिंदे गटातून केला जात आहे.
- भाजपसाठी सर्वात मोठा प्रश्न शिंदेंचा नव्हे तर कोणत्या चेहऱ्यावर डाव मांडायचा हा आहे? शिंदे हे एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे एक सर्वमान्य चेहरा म्हणून त्यांच्या नावाची पुष्टी झाली आहे.
- एकनाथ शिंदे हा मराठा चेहरा आहेत. भाजपपुढे त्यांना हटवून त्यांच्याजागी ओबीसी चेहरा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. यामुळे भाजपला या प्रकरणी संतुलन साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत. या निवडणुकीतही भाजपने फडणवीस यांना पुढे करून तेच आपला प्रमुख चेहरा असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस हे सवर्ण समुदायाचे आहेत. म्हणजे ते ओबीसी प्रवर्गात मोडत नाहीत. त्यानंतरही भाजपला त्यांना बाजूला सारणे अवघड ठरेल. कारण, राज्य भाजपमध्ये त्यांचे स्वतःचे समर्थक आहेत. विशेषतः मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीलाही भाजपने फडणवीसांऐवजी दुसऱ्या एखाद्या नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री करावे असे वाटत नाही.
- महायुतीत ही कवायत सुरू असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणालेत की, निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासंबंधी कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू नये. ते उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नसतील तर त्यांनी दिल्लीत यावे. त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री दिले जाऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे या प्रकरणी कोणती भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.