मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना साताऱ्यातून समोर आली आहे. मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावातून हेलिकॉप्टरने पुण्याला जात होते. यावेळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग कर
.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी दरे येथे आले होते. येथून ते शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरमधून मुंबईला जाणार होते. ठरल्यानुसार हेलिकॉप्टरने इथून टेक ऑफ केले. मात्र थोड्याच वेळात हवामान बदलले आणि ढग दाटून येत पावसाला सुरूवात झाली. या परिस्थितीत संभाव्य धोका ओळखून पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफच्या अवघ्या पाच मिनिटात हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं.
रस्ते मार्गाने रवाना
“पुणे आणि सातारा येथे हवामान स्वच्छ होतं, पण हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर अचानक काही ढग तयार झाले. पायलटनं कोणताही आपत्कालीन कॉल केला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पायलटनं हेलिकॉप्टर मूळ स्थानावर नेण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात हे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आलं. दुपारी चारच्या सुमारास हे हेलिकॉप्टर परत आलं. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाहनानं पुणे विमानतळाकडं रवाना झाले,” अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
इमर्जन्सी लँडिंगचा थरार
“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंग करण्यामागचा थरार सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी पुण्याच्या दिशेला जात असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे हेलिकॉप्टर हवेत भरकटायला लागलं. कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटांवर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले”, असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं.