राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. अज्ञात हॅकर्सनी आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले असून त्यावरुन काही आक्षेपार्ह पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती स्वत: आदिती तटकरे यांनी दिल
.
आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया एक्स वर याबाबतची माहिती दिली आहे. “नमस्कार, माझे फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व”, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
हॅकींगच्या घटनांमध्ये वाढ
लोकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रेटींचे फेसबुकसह इतर सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या हॅकर्सची मजल आता राजकीय नेत्यांचे अकाउंट हॅक करण्यापर्यंत गेली आहे. हॅकर्स फेसबुक अकाउंट हॅक करुन आर्थिक फसवणूक करतात. फेसबुक अकाउंट हॅक केल्यानंतर फ्रेंडलीस्टमधील मित्रांकडे विविध कारणे सांगून पैशांची मागणी करतात. मी हॉस्पिटलमध्ये आहे, अडचणीत आहे, पैसे पाठवा, असे कारणे देत पैशांची मागणी केली जाते. लोकही विश्वास ठेवून पैसे पाठवतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी खात्री करुनच पैसे पाठवायला हवेत.