महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप मुंबईतील अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. यासंबंधी भाजप आमदार राम कदम, सुनील राणे, भारती लव्हेकर यांची नावे पुढे आली असून, यामुळे त्यांच्या समर्थकांत मोठी खळबळ माजली आ
.
भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत विभागात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाने घाटकोप पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राम कदम यांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राम कदम हे भाजपचे मुंबईतील बडे नेते आहेत. पण पक्षाने सुमार कामगिरीचे कारण देत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते. याची दखल घेत भाजपने या ठिकाणी फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राम कदमांनी मनसेतून भाजपमध्ये केला होता प्रवेश
राम कदम यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते विधानसभेवर पोहोचले होते. पण 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. ते आपल्या मतदारसंघात दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आदी विविध धार्मिक कार्यक्रम राबवतात. पण गेल्या 5 वर्षांत त्यांनी कोणतीही चमकदार कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांची फेरनिवड होण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे भाजप नेतृत्वाने यावेळी त्यांना थांबण्याची सूचना दिल्याची माहिती आहे.
नव्या दमाचा चेहरा देण्याची शक्यता
उल्लेखनीय बाब म्हणजे राम कदम हे आपल्या मतदारसंघात नेहमीच सक्रिय असतात. पण भाजपच्या निर्णयाची कुणकुण लागल्यानंतर गत काही दिवसांपासून त्यांनी आपले दौरे कमी केलेत. याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असताना आता भाजपनेच त्यांचा पत्ता कट केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप घाटकोपर पश्चिम मतदारसंघात कुणाला संधी देणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हा चेहरा नव्या दमाचा असेल असे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, भाजपने सायन मतदारसंघात कॅप्टन सेल्व्हन यांच्या जागी राजश्री शिरवडकर, घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्या जागी प्रकाश मेहता, बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्या जागी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. भाजपने वर्सोवा मतदारसंघातून भारती लव्हेकर यांचा पत्ता कट करण्याचेही संकेत दिलेत.
खाली वाचा रेड झोनमध्ये असणाऱ्या आमदारांची नावे?
- घाटकोप पश्चिम – राम कदम
- घाटकोपर पूर्व – पराग शहा
- सायन – तमिल सेल्व्हन
- बोरिवली – सुनील राणे
- वर्सोव्हा – भारती लव्हेकर