महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज अखेर घोषणा झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यात प्रत्येक जण आपला मताधिकार बजावून लोकशाहीच्या या पंचवार्षिक उत्सवात आपला सहभाग नोंदवेल. पण यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे अत्यावश्यक आह
.
अनेकदा आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही? आपले मतदान केंद्र नक्की कुठे आहे? याचा शोध आपण मतदानाच्या दिवशी ऐनवेळी घेतो. यामुळे काहीवेळा आपल्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषत: यामुळे आपल्याला आपल्या मताधिकारापासून वंचितही राहण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वप्रथम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासून घ्या. ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया मतदार यादीतील आपले नाव कसे तपासावे याची माहिती…
मतदार यादीत नाव कसे तपासायचे?
- मतदार यादीत आपले नाव शोधण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत ऑनलाइन प्रकियेद्वारे हे काम करू शकता.
- यासाठी तुम्हाला सर्वांत आधी electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी लागेल.
- या लिंकवर जाताच तुम्हाला एका पेजवर तुमचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागेल. त्यानंतर मतदार यादीचे पेज उघडेल.
- यासाठी आणखी एक मार्ग आहे. तुम्हाला electoralsearch.eci.gov.in वर EPIC किंवा मतदार आयडी क्रमांक टाकूनही आपले नाव तपासता येईल.
- मतदार यादीतील नाव शोधण्याचे दोन्ही पर्याय तुम्हाला electoralsearch.eci.gov.in ला भेट दिल्यावर सर्वांत वरच्या बाजूला दिसतील.
- या प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील मतदार यादीत तुमचे नाव तपासता येईल.
मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे?
- मतदार म्हणून आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक 6 भरावा लागेल. त्याचा अर्ज इतर अर्जांसह ECI वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेलच्या मदतीने साइन अप केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज घरबसल्या भरता येईल.
- नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि नातेवाईक (वडील, आई, पती किंवा पत्नी) आदी तपशील भरण्यासह अर्जदाराला जन्म तारीख सिद्ध करण्यासाठी ‘सक्षम स्थानिक संस्था/महानगरपालिका प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र’ यापैकी कोणत्याही एका दस्तावेजाची स्वयंसाक्षांकित प्रत द्यावी लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव नोंदवता येईल.