देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे आदरपूर्वक संबंध होते. राज्यातील सर्वच नेत्यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल
.
निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
“भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. अनेक. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही. त्यांचे कार्य , विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करतील. त्यांच्या निधनाने आज आपल्या देशाने सर्वात “अमूल्य रत्न” असे व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श व्यक्ती गमावले आहे. श्री.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
उद्योग जगताला नवी दिशा देणारे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व – मंत्री अतुल सावे
भारताच्या उद्योग जगताला नवी दिशा देणारे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व स्व. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रभक्ती आणि प्रामाणिक कार्याचे ते अद्वितीय प्रतीक आहेत.. त्यांच्या कार्यस्मृती कायम प्रेरणा देत राहतील..त्यांना चिरशांती लाभो ही प्रार्थना. ॐ शांती
विश्वास आणि औदार्याचे प्रतिक – खासदार सुप्रिया सुळे
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली.त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उद्योग विश्वातला आधारवड हरपला – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
‘उपभोगशून्य स्वामी’ असं ज्यांचं सार्थ वर्णन करता येईल, स्वत:च्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने या देशात मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारे उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली! रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वातला आधारवड हरपला आहे. ही हानी कधीही भरून निघणार नाही.
ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व – मंत्री गिरीष महाजन
भारतमातेच्या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! भारताच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, मानवतावादी दृष्टिकोनातून प्रचंड समाजकार्य घडवणारे आपले सर्वांचे आदरणीय पद्मविभूषण रतन टाटा जी यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. भारतमातेच्या या महान सुपुत्रास अखेरचा सलाम…! भावपूर्ण श्रद्धांजली !
भारतीय उद्योगविश्वातील महानायक – काँग्रस नेते बाळासाहेब थोरात
देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणा-या टाटा ग्रुपचे प्रमुख, भारतीय उद्योगविश्वातील महानायक रतन टाटा यांच्या निधनाने भारताने एक दूरदृष्टीचे, निस्वार्थी आणि समाजाभिमुख व्यक्तीमत्व गमावले आहे. उद्योग विश्वात शिखरावर राहूनही त्यांनी कायम मानवी मूल्ये जपत सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि लोककल्याणासाठीची कटिबद्धता नेहमीच प्रेरणा देत राहील. रतन टाटा यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
देशभक्ती आणि दूरदृष्टी नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख, महान देशभक्त आणि पद्मविभूषण किताबाने सन्मानित श्री. रतनजी टाटा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांनी केवळ भारतीय औद्योगिक क्षेत्राला नवीन उंचीवर नेले नाही, तर आपल्या सामाजिक कार्यांद्वारेही असंख्य जीवनांमध्ये सकारात्मक बदल घडवला. त्यांची साधी राहणी, कर्तृत्व, नेतृत्व, देशभक्ती आणि दूरदृष्टी नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती!
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….
रतन टाटा यांचे निधन:राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणार

देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले होते. पूर्ण बातमी वाचा…
आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला:राज ठाकरे यांनी जागवल्या आठवणी; रतन टाटा यांच्या श्नानप्रेमचा किस्साही सांगितला

रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणी देखील राज ठाकरे यांनी सांगितल्या. इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाचा एक किस्सा देखील सांगितला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे आज मी माझा ज्येष्ठ मित्र गमावला असून त्याचे दुःख आहेच, मात्र एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्वांतरही निर्लेप राहिलेला उद्योजक गमवल्याचे त्याहून मोठे दुःख असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…
सामाजिक जाणीवेतून यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व:त्यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सामाजिक जाणीवेतून यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व असा उल्लेख शरद पवार यांनी केला आहे. मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….