विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोमवारी मंत्रालयातील आंदोलनाच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली टीका फेटाळून लावली. मी जाळी नसलेल्या इमारतीहूनही उडी मारू शकतो. पण ज्यांची माझ्यासारखा प्रयोग करायचा आहे, त्यांनी डबल जाळी लावून उड
.
नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात गत आठवड्यात आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. या आंदोलनाद्वारे त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्यास विरोध केला होता. विधानसभेच्या उपाध्यक्षांनीच मंत्रालयावरून उडी मारल्यामुळे या आंदोलनाची देश पातळीवर दखल घेतली गेली. पण राज ठाकरे यांनी यांसंबधी नरहरी झिरवळ यांच्यावर निशाणा साधला होता. तुमच्या सरदारने सत्तेच्या जाळ्यात उडी मारली होती ना? असा सवाल उपस्थित करत त्यांनी झिरवळांना जाळी नसलेल्या इमारतीवरून उडी घेण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता.
मी आदिवासी, कुठूनही उडी मारेन
नरहरी झिरवळ यांनी सोमवारी त्यांच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, मी आदिवासी व्यक्ती आहे. त्यामुळे मी जाळी नसलेल्या इमारतीवरूनही उडी मारू शकतो. आमच्या आंदोलनाला कुणी सर्कस म्हणाले असेल किंवा तमाशा म्हणाले असेल हरकत नाही. पण त्यातून माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला हे महत्त्वाचे आहे. आता आमच्यासारखा प्रयोग करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अजून डबल जाळी लावून उडी मारावी, असे ते म्हणाले.
आता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनाचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. ते म्हणाले होते, सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे म्हणणे शक्य नव्हते, त्यामुळे ‘जनतेच्या सेवेला सत्ता हवी’, म्हणत तुम्ही आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचे सोडून कुणाचेही भले करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?
आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांना भेटून जाब विचारणार
नरहरी झिरवळ यांनी यावेळी धनगड नावाने जारी करण्यात आलेले जातीचे दाखले रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याचेही संकेत दिलेत. आम्ही आदिवासींचे बोगस दाखले रद्द करण्याची मागणी केली होती. पण तेव्हा सरकारने हे आपल्या अधिकारक्षेत्रात नसल्यांचा दावा करत हात झटकले होते. मग आता त्यांनी हा निर्णय कसा घेतला? या प्रकरणी उद्याच मुख्यमंत्र्यांना भेटून मी जाब विचारणार आहे, असे ते म्हणाले होते.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही
नरहरी झिरवळ यांनी यावेळी आपली शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, मी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा कुणीही करू शकत नाही. ज्या दिवशी मी त्यांच्यापासून वेगळा झालो, त्यानंतर पुन्हा मी त्यांच्यापुढे गेलो नाही. मुळात त्यांच्यापुढे जाण्याची हिंमतच माझ्यात नाही. त्यांच्यापुढे जाण्यासाठी खूप प्रगल्भता असावी लागते. ती प्रगल्भता माझ्यात नाही.
काही दिवसांपासून नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषतः त्यांचे सुपुत्र वारंवार शरद पवार गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे या चर्चेला बळ मिळाले होते. पण झिरवळ यांनी आपली पवारांपुढे जाण्याची हिंमत नसल्याचे नमूद करत एकप्रकारे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविरामच दिला आहे.