मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
.
शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पण शिवसेनेतील फुटीपासून दसरा मेळाव्यासाठी हे मैदान शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. मागच्या वर्षी या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर यंदाही हे मैदान त्यांच्याच पक्षाला मिळाले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने गत 8 महिन्यांत 4 स्मरणपत्रे पाठवली होती. त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला होता. त्यानंतर महापालिकेने हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवला होता. त्यानुसार, आज या परवानगीचे पत्र ठाकरे गटाला मिळाले आहे.
यासंबंधी ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. या परवानगीसाठी आम्ही 4 स्मरणपत्रे महापालिकेला पाठवली होती. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगरविकास विभागाची मंजुरी पाठवली होती. त्यानंतर आज या परवानगीचे पत्र शिवसेना ठाकरे गटाला प्राप्त झाले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होणार
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी तशी तयारी सुरू झाल्याचीही माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 40 हजार शिवसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाचा गतवर्षीचा दसरा मेळावा आझाद मैदानात झाला होता. तत्पूर्वी पहिला दसरा मेळावा बीकेसी येथेच पार पडला होता. पण यंदा आझाद मैदानात जागेची अडचण असल्यामुळे यंदा पुन्हा हा मेळावा बीकेसी येथेच होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळाली आहे.
हे ही वाचा…
अमित शहांच्या विधानाचा फडशा दसरा मेळाव्यात पाडणार:उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा; ‘दार उघड..’ पक्षाचे नवे थीम साँग केले लॉन्च
मुंबई – गेली 2 अडीच वर्षे आम्ही न्याय मंदिराची दारं ठोठावत आहोत, हात दुखायला लागले. न्याय देवतेवर विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाही. मग आम्ही असे ठरवले की जगदंबेला साकडे घालायचे की तू तरी आता दार उघड. गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत, मला विश्वास आहे की ही सगळी तोतयागिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकारचे घोटाळे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. आई जगदंबेला मनापासून हाक मारली की ती भक्ताच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात दिसले आहे, आणि पुढेही दिसेल. वाचा सविस्तर