Maharashtra Din 2025: आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यामुळं महाराष्ट्र दिनाकडे जनता भावनिक दृष्ट्या पाहत आली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले. त्यानंतर मात्र नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अनेकजण नवीन जल्लोष करु लागले. मुंबईतील इमारतींना तर सलग पाच दिवस रोषणाई करण्यात आली. मुंबईत पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला याचा एक व्हिडिओ महाराष्ट्र परिचय केंद्राने काही वर्षांपूर्वी ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केला होता. याची एक झलक पाहुयात.
1 मेच्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा केली. नेहरूंनी एका विजेच्या बटणाची कळ दाबताच व्यासपीठाजवळ लावलेल्या भगव्या रंगातील महाराष्ट्राचा नकाशा उजळून गेला अन् अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. महाराष्ट्रात तब्बल पाच दिवस राज्याच्या निर्मितीचा उत्साह साजरा केला गेला. याची झलकही व्हिडिओत पाहायला मिळते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारोंचा समुदाय किल्ले शिवनेरीवर पोहोचला होता. शिवनेरी किल्ल्यावर बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण झाले. अन् संपूर्ण आसमंतात शिवाजी महाराज की जय या घोषणा दुमदुमू लागल्या.
1 मे 1960 रोजी दुपारी 12.30 वाजता मुंबईच्या सचिवालयासमोर मोठा मंडप उभारण्यात आला होता. येथेच यशवंतराव चव्हाण व इतर मंत्रिमंडळातील सदस्यांना राज्यपाल श्री प्रकाश यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर दुपारी तीन वाजता मुंबईतील राणीच्या बागेपासून थाटात मिरवणूक निघाली. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, 200 ट्रक, लेझीम पथक यांच्यासह वाजत गाजत निघालेली मिरवणूक दादरच्या शिवाजी पार्कला पोहोचली. संध्याकाळच्या कार्यक्रमात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा या गीताला वसंत देसाई यांनी संगीत दिलं आणि लता मंगेशकर यांनी ते सादर केले होते.
Maharashtra has a strong social, ideological, political,historical & cultural heritage. It contributes to the development of the country & maintained its invaluable heritage. It’s history of religious & social reforms is equally inspiring.
Wishing Everyone on #MaharashtraDay pic.twitter.com/HtYfplHGSs
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) May 1, 2022
या कार्यक्रमांत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनीही भाषण केले. मुंबईतील सर्वच इमारतींना तब्बल पाच दिवस रोषणाई केली होती. या व्हिडिओत देशातील प्रमुख धर्माच्या धर्मगुरूंनी मुंबईतील क्रॉस मैदानात केलेल्या सामुहिक प्रार्थना ते कामगारांनी काढलेल्या जल्लोष यात्रा आणि सिंहगडावरील लढाई यासारख्या घटनादेखील पाहायला मिळतात.