चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, बारामती : बारामती मतदार संघातून भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला. मात्र यामुळे बारामती मतदार संघात सुप्रिया सुळेंची ताकद कमी झाल्याचं बोललं जातंय. मुळात बारामती लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही. त्यामुळं बारामतीचा गड सुप्रिया सुळेंसाठी अवघड झाल्याची चर्चा सुरुय.
बारामतीचा गड सुप्रियांसाठी अवघड
संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशानं सुप्रियांची अडचण
6 मतदारसंघात मविआचा आमदारच नाही
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न अगदी लोकसभा निवडणुकीपासून झाला. नुकताच भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला. यातून भाजपनं 2029 ची आतापासूनच तयारी सुरु केल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही आमदार सध्या नाही. एवढंच नाही मविआच्या मित्रपक्षांचाही या मतदारसंघात आमदार नाही. भाजपचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार मतदारसंघात आहे. त्यातल्या त्यात जनाधार असलेला काँग्रेसचे जे नेते संग्राम थोपटे होते, ते आता भाजपात गेलेत.
सुप्रियांना बारामतीचा गड अवघड
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी (SP गटाचा) एकही आमदार नाही
या मतदारसंघात मविआच्या मित्रपक्षांचाही आमदार नाही.
6 मतदार संघात भाजपचे 2, राष्ट्रवादी (AP गट) 3, शिवसेनेचा एक आमदार
नुकताच काँग्रेस नेते संग्राम थोपटेंचा भाजपात प्रवेश
हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असले तरी त्यांचाही काही भरवसा नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळं सुप्रिया सुळेंना बारामतीचा गड आतापासूनच अवघड होत असल्याचं दिसतंय. मात्र कितीही नेत्यांनी भाजपत प्रवेश केला तरी सुप्रिया सुळेंचं सहाही मतदारसंघात चांगलं काम आहे. त्यामुळं त्यांचं वर्चस्व कमी होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलाय.
दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांनीही अशी शक्यता नसल्याचं म्हणत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी भावना व्यक्त केलीय. दरम्यान सुप्रिया सुळे सातत्यानं मतदारसंघात सक्रीय राहिल्या. ठोस भूमिका घेत राहिल्या तर सुळेंना बारामती टिकवणं सोपं होईल असं मत जाणकारांनी मांडलंय.
पुढच्या लोकसभा निवडणुकीला बराच वेळ असला तरी येत्या वर्षअखेर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका होणार आहेत. तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला या बरीच कसरत करावी लागणार असं दिसतंय. महाराष्ट्रातलं राजकारण सध्या दरवर्षी वेगळी कलाटणी घेताना बघायला मिळतं. मात्र सध्याचं चित्र बघता सुप्रिया सुळेंना बारामतीचा गड जड दिसतोय. तो 2029 ला यशस्वीरित्या सर करायचा असेल तर सुप्रिया सुळेंना आतापासून लोकसभा मतदारसंघात अजून जातीनं लक्ष घालण्याची गरज आहे.