राष्ट्रवादीची स्थापना संघर्षातून झाली असून संघर्षातूनच पक्ष मोठा झाला पाहिजे. कोणावरही अन्याय करायचा नाही अन् कोणी चुकीचे वागले तर सहन करू नका, असा सल्ला अजित पवार यांनी शनिवारी वसमत येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिला आहे.
.
वसमत येथे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भुमीपूजन व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश नवघरे, आमदार विक्रम काळे, माजीमंत्री नवाब मलीक, रामदास पाटील सुमठाणकर, बी. डी. बांगर, केशव दुबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वसमत तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, राज्यात कृषीपंपाचे वीज देयक माफ केल्यानंतर शासनाला १९ ते २० हजार कोटी रुपये भरावे लागणार आहे. यातून आम्ही लाडक्या शेतकऱ्यांचा भार उचलला आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील निराधारांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईल याबाबत लवकरच नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दिव्यांग, महिला बाल कल्याण विभागालाही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून ज्या कामासाठी निधी दिला त्यावरच खर्च झाला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. घरकुल योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले.
राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत आहे. राज्यातील कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती संघर्षातून झाली आहे त्या प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष देखील संघर्षातून स्थापन झाला असून संघर्षातूनच मोठा झाला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र कुणावर अन्याय करायचा नाही अन कोणी चुकीचे वागत असेल तर सहन करायचे नाही, असा सल्लाही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.