जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आरोग्य, पाणी व घरकुल यासह इतर योजना केंद्र शासनाकडून राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेत लाभार्थ्यांनी सक्षम झाले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी गुरुवारी ता. २४
.
पंचायत राज दिना निमित्त डिग्रस येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ, केशव गड्डापोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशांत डिग्रसकर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश म्हणाल्या की, प्रत्येक नागरीकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मात्र अनेक वेळा आजारी पडल्यानंतर त्यांचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत सापडतात. या परिस्थितीवर मात करता यावी यासाठी आयुष्मान भारत योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे कार्ड काढल्यानंतर रुग्णांवर पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनाही दिलासा मिळतो. त्यासाठी सर्वांनी आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले.
या सोबत केंद्र शासनाने घरकुल योजना हाती घेतली असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला हक्काचे घरकुल मंजूर केले जात आहे. या घरकुलाचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. प्रत्येक कुटंुंबाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदर योजना शासनाची योजना आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्या ऐवजी हि योजना आपल्या गावाची आहे, आपली आहे हे लक्षात घेऊन योजनांची कामे दर्जेदार करुन घ्यावीत. तसेच या योजनेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरु करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमस्थळी स्टॉलला दिली भेट
यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बालकल्याण विभाग, पाणी पुरवठा विभाग, घरकुल विभाग, समाज कल्याण विभागासह इतर विभागांनी योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारले होते. या स्टॉलला मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी भेट देऊन पाहणी केली.