पुण्यातील 6500 कोटींच्या ‘त्या’ रोड प्रोजेक्टला कॅबिनेटची मंजुरी! ट्रॅफिकमधून सुटका निश्चित


Pune Infrastructure Project: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे -चाकण-शिक्रापूर एन एच 548 डी या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गावरील तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तळेगाव ते चाकणदरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

मावळ, खेडसह शिरुर तालुक्यातील नागरिकांतून आनंद

तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रलंबित आणि बहुचर्चित महामार्गाचे काम सुरु होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मावळ, खेडसह शिरुर तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

6500 कोटी रुपयांचा प्रकल्प

10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत प्रस्तावित चार पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख केला होता. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने मावळ आणि खेड तालुक्यातील वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला असल्याचे सांगतानाच अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पुणे ते शिरुर आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राज्य सरकारकडून प्रस्तवित असलेल्या महत्वाच्या दोन रस्त्याबाबत घोषणा केली.

कामाच्या निविदा आणि भूसंपादन प्रक्रिया बाकी

पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे साडेसात 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत प्रस्तावित मार्गाला संमती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाच्या निविदा आणि भूसंपादन प्रक्रियेला अजून किती दिवस लागणार असा प्रश्न कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे प्रलंबितच राहिले. गतवर्षी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आला. नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम आता होणार आहे.

भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये

सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी, कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित होता. ज्याला 23 एप्रिल रोजी मंजुरी देण्यात आली. भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये अपेक्षित असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर गेला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 56 किलोमीटर अंतराच्या प्रलंबित महामार्गाच्या कामासाठी तळेगाव-चाकण-महामार्ग कृती समिती गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

jl99 slot