काश्मीरच्या रम्य थंड हवेत काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मावस भावंडांच्या कुटुंबांवर अचानक अतिरेक्यांनी घाला घातला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात घरातील कर्ते पुरुष अतुल मोने (४३), संजय लेले (५०) आणि हेमंत जोशी (४५) यांचा मृत
.
“हसत-खेळत बसलो होतो… आणि क्षणात कोसळलो”
अनुष्का मोने यांनी बहिणीशी बोलताना सांगितलेला थरारक प्रसंग ऐकून राजश्री अकुल यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. “त्यांनी विचारलं, ‘तुम्ही हिंदू आहात का?’ आणि क्षणात गोळीबार सुरू झाला…” असा भेदरलेला, सुन्न करणारा प्रसंग त्यांनी वर्णन केला. संजय लेले यांच्या डोक्यात, अतुल मोने यांच्या पोटात आणि हेमंत जोशी यांच्या छातीत गोळी लागली. डोळ्यांसमोर घडलेल्या या प्रसंगाने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.
हर्षचे धैर्य-मृत्यूच्या सावलीत उभा राहत दिला कुटुंबाला आधार : संजय लेले यांचा मुलगा हर्ष (२०) याच्या बोटाला गोळी लागली, पण त्याने स्वतःचा त्रास विसरून तिन्ही कुटुंबांना सावरले. वडील आणि दोन मामा गमावले तरीही तो खंबीरपणे उभा राहिला. डोंबिवलीतील नातेवाईक राजेश कदम यांनी त्याच्या धैर्याचे कौतुक केले.
१४ वर्षांनी केलेली सहल ठरली अखेरची
संजय लेले यांनी पत्नीच्या तब्येतीमुळे अनेक वर्षे प्रवास टाळला होता. यंदा प्रकृती ठीक असल्याने १४ वर्षांनी सहलीचा प्लॅन केला. पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. “ते रविवारी सकाळी ‘आठवडाभरात परततो’ म्हणून निघाले… आणि दोनच दिवसांत त्यांचं शरीर परतलं,” अशी भावना शेजारी रमेश अमृतकर यांनी व्यक्त केली. ध्रुवची परीक्षा संपली आणि… हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झाला होता. त्यामुळेच ही सहल ठरवण्यात आली होती.
कठोर सुरक्षा हवी, नागरिकांची मागणी
या भीषण घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना आहे. “पर्यटकांना केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी,” अशी मागणी डोंबिवलीकरांनी केली आहे. कुटुंब गहिऱ्या अंधारात गेल्यानंतरही त्यांच्या मागे राहिलेल्यांसाठी निदान न्याय आणि सुरक्षिततेची हमी द्यावी, हीच अपेक्षा असल्याची भावना या वेळी डोंबिवलीकरांनी व्यक्त केली आहे. काही मंत्र्यांनी याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
सुरुवातीला हेमंत यांचे नाव मृतांत नव्हते
सुरुवातीला हेमंत जोशींचे नाव मृतांच्या यादीत नव्हते, तेव्हा आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. पण रात्री १.३० च्या सुमारास आम्हाला कळले की हेमंतवरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला. या दुःखद बातमीनंतर आमच्या भाग्यशाला मैदान परिसरातील सावित्री को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी (डोंबिवली) मध्ये शोकाचे वातावरण आहे. ही माहिती देताना हेमंत जोशीच्या चुलत भावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.