विदर्भातील ब्रह्मपुरी शहराने बुधवारी उष्णतेचा नवा विक्रम नोंदवला आहे. येथे कमाल तापमान 45.6 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. यामुळे सलग दोन दिवस सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या चंद्रपूरला मागे टाकले आहे.
.
चंद्रपूरमध्ये बुधवारी 45.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. मंगळवारी चंद्रपूरमध्ये 45.8 अंश सेल्सियस तर सोमवारी 45.6 अंश सेल्सियस तापमान होते. विदर्भातील इतर शहरांमध्ये अकोला (45.0), अमरावती (44.6), गडचिरोली (44.6), वर्धा (44.7), नागपूर (44.4) आणि यवतमाळ (43.8) अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
काही शहरांना किंचित दिलासा मिळाला असून वाशिम (43.0), गोंदिया (42.5) आणि बुलढाणा (40.7) अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागपूर शहरातील 13 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 या वेळेत रेड ब्लिंकवर ठेवण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील चौकांमध्ये ग्रीन नेट लावण्यात आल्या आहेत.