माणूस हा जन्मत: ज्ञानी नसतो, पण त्याला शिकण्याची, समजून घेण्याची आणि विचार करण्याची विलक्षण क्षमता असते. या क्षमतेचा विकास पुस्तकांच्या सहाय्याने होतो. पुस्तक हे केवळ ज्ञानाचं साधन नसून, ते माणसाच्या विचारांची दारं उघडणारं, मनाला दिशा देणारं आणि आयुष
.
भारतीय समाजात पुस्तकांचे स्थान फारच उच्च मानले गेले आहे. “विद्या ददाति विनयम्” या उक्तीप्रमाणे ज्ञान म्हणजेच विनय आणि सभ्यता या गुणांचा उगम. ऋग्वेदापासून ते कालिदासाच्या रचनांपर्यंत आणि तुकोबांच्या अभंगांपासून ते प्रेमचंदांच्या कहाण्यांपर्यंत भारतात वाचन आणि लेखन ही एक सांस्कृतिक परंपरा आहे. पुस्तक ही केवळ माहिती देणारी वस्तू नसून, ती संस्कृतीची वाहिका असते.
मात्र, अलीकडील काळात ही परंपरा धोक्यात आली आहे, असे म्हणावे लागते. डिजिटल क्रांती, सोशल मिडिया, तात्काळ समाधान मिळवण्याच्या युगात वाचनासाठी लागणारी एकाग्रता, वेळ आणि संयम या गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. जेव्हा एका क्लिकवर अनंत माहिती उपलब्ध होते, तेव्हा वाचनासाठी पुस्तके निवडणं काहीसं मागास वाटू लागते. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये मोठा फरक असतो हे समजणं महत्त्वाचं आहे. माहिती ही क्षणभंगुर असते, पण ज्ञान हे खोलवर रुजलेले असते आणि ज्ञानाची बीजे ही पुस्तकांतूनच पेरली जातात.
या दिवसाची सुरुवात कशी झाली?
युनेस्को (UNESCO) अर्थातच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने १९९५ साली जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन अधिकृतपणे जाहीर केला. या दिनाच्या मागील प्रेरणा अनेक स्तरांवर आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा योगायोग म्हणजे २३ एप्रिल हा दिवस काही महान साहित्यिकांच्या मृत्यूदिनाशी संबंधित आहे. इंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर, इतिहासातील अत्यंत प्रभावी पुस्तकांपैकी एक मानले जाणाऱ्या “Don Quixote” या साहित्याचे स्पॅनिश भाषेतील एक महान लेखक मिगेल दे सर्व्हांतेस या दोघांचे निधन आजच्याच दिवशी १६१६ मध्ये झाले. या दोघांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अमूल्य होतं. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला आणि जगभरातील लोकांनी वाचनाकडे वळावं, पुस्तकांची कदर करावी यासाठी युनेस्कोने हा उपक्रम सुरू केला.
विशेष म्हणजे या दिवसाचं निमित्त साधून युनेस्को एका वर्षासाठी पुस्तकाच्या जागतिक राजधानीची निवडही करते. यंदा २०२५ मध्ये ब्राझीलमधील रियो डी जेनेरियो या शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली गेलीय.

जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व
जागतिक पुस्तक दिन म्हणजे केवळ एखाद्या दिवसापुरती वाचनाची आठवण नव्हे, तर ही एक संधी आहे आपण किती वाचतो? काय वाचतो? आणि वाचनातून आपले विचार कितपत समृद्ध झालेत? स्वतःला विचारून पाहण्याची. युनेस्कोचा उद्देशही वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणे, लेखनासाठी प्रेरणा देणे आणि पुस्तकाच्या माध्यमातून विचारमंथनास चालना देणे हाच आहे. आजही अनेक विकसनशील देशांत पुस्तकांपर्यंत पोहोचणे एक मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या लोकशाही देशात, जिथे विचारस्वातंत्र्य हे मूलभूत मूल्य मानलं जातं, तिथे वाचनसंस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. कारण लोकशाही टिकते ती विचारांनी, आणि विचार येतात ते वाचनातून.
पुस्तक हे केवळ एक वस्तू नाही, ती एक वैचारिक अनुभूती असते. लेखकाच्या कल्पनांचे, अनुभवांचे आणि विचारांचे प्रतिबिंब वाचकाच्या मनात उमटवण्याची ताकद पुस्तकात असते. वाचक आणि लेखक यांच्यातला हा संवाद केवळ शब्दांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो अनेकदा आत्म्याला स्पर्श करतो.
एका कवितेची एक ओळ मनात खोलवर रुजते, एखाद्या कथेतील पात्र आपले वाटू लागते, एखादा विचार आपल्या जगण्याच्या मार्गात परिवर्तन घडवतो, हीच तर पुस्तकांची खरी ताकद आहे. त्यामुळेच, आजही तान्ह्या मुलांच्या हातात पुस्तकं द्यावीत, शालेय जीवनात वाचनासाठी वेळ राखून ठेवावा, आणि प्रौढांनाही अधुनमधून पुस्तकांकडे वळण्याची प्रेरणा मिळायला हवी.
जगातील पहिले पुस्तक: इतिहास, उगम आणि प्रकाशनाची कहाणी
माणूस भाषेचा उपयोग संवादासाठी करत होता, पण त्याला कायमस्वरूपी माहिती जतन करता यावी यासाठी लेखनकलेची गरज भासली. या गरजेपोटी सुमारे इ.स.पू. ३४०० च्या सुमारास, आजच्या इराक देशाच्या दक्षिण भागात असलेल्या मेसोपोटामिया प्रदेशातील सुमेरियन संस्कृतीत लेखनकलेचा उगम झाला.
सुमेरियन लोकांनी तयार केलेली खिळेचिन्ह लिपी (Cuneiform Script) ही जगातील सर्वात प्राचीन लिपींपैकी एक मानली जाते. ती मातीच्या लहान फळ्यांवर खास टोकदार लाकडाने कोरली जात असे. सुरुवातीला ही लिपी केवळ व्यवसायिक व्यवहार, कर वसुली, आणि शेतीविषयक नोंदी करण्यासाठी वापरली जात होती. पण हळूहळू या माध्यमातून कथा, कविता आणि धार्मिक मजकूरही लिहिला जाऊ लागला.
कालांतराने ताडपत्रांवरील ग्रंथ, पशूंच्या कातड्यांवरील हस्तलिपी, गुंडाळ्यांपासून ते आधुनिक प्रिंटिंग प्रेसपर्यंतचा हा प्रवास म्हणजेच पुस्तकांच्या उत्क्रांतीची कहाणी आहे. म्हणूनच “पहिलं पुस्तक” या संकल्पनेच्या व्याख्या त्या-त्या काळानुसार बदलत गेल्या आहेत.
सुमेर सभ्यतेतील पहिले लिखित दस्तऐवज
जगातील सर्वात जुने लेखन इ.स.पूर्व ३००० च्या सुमारास सुमेर सभ्यतेत (आधुनिक इराकमधील मेसोपोटेमिया प्रदेशात) सुरू झालं. येथे क्युनिफॉर्म लिपीचा वापर करून मातीच्या पाटीवर व्यापारी व्यवहार, कर प्रणाली, आणि धार्मिक विधींची नोंद ठेवली जात होती. या लिखित दस्ताऐवजांना ‘पुस्तक’ म्हणणे थोडेसे तांत्रिक वाटेल, पण हेच लेखन पुढे साहित्याच्या स्वरूपात विकसित झाले.

क्युनिफॉर्म लिपीचा वापर करून मातीच्या पाटीवर केलेले लिखाण
गिलगमेश महाकाव्य : जगातील पहिले साहित्यिक पुस्तक
सुमेर लोकांनीच लिहिलेल्या “गिलगमेश महाकाव्या”ला जगातील पहिले साहित्यिक पुस्तक मानले जाते. हे पुस्तक इ.स.पू. २१०० ते १२०० च्या दरम्यान लिहिले गेले. यात एका अर्धदैवी नायकाच्या साहसांची कहाणी आहे. हे महाकाव्य मातीच्या पाट्यांवर लिहिले गेले असून त्यामध्ये मृत्यु, मैत्री, देवतांचा हस्तक्षेप, आणि मानवी जीवनाची चिंता यांचा सखोल विचार आहे. ‘कथा’ म्हणून सांगितले गेलेले हे पहिले लेखन असावे, असे इतिहासकार मानतात.
इतिहासकार आणि पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते, सुमेर लोकांनी लिहिलेले ‘गिलगमेशचे महाकाव्य’ (Epic of Gilgamesh) हे जगातलं सर्वात जुनं साहित्यिक पुस्तक मानलं जातं. याची रचना सुमारे इ.स.पू. २१००–२००० च्या दरम्यान झाली असावी. या महाकाव्याचं केंद्रस्थानी आहे गिलगमेश, उरूक (Uruk) या शहराचा राजा. गिलगमेश अर्धा देव आणि अर्धा मनुष्य होता. त्याच्या साहसांची आणि आत्मशोधाची ही कथा अक्कडियन भाषेत लिहिली गेली होती. यात मैत्री, मृत्यू, भय, अमरत्वाची आकांक्षा यासारख्या मानवी भावनांचं अत्यंत सुंदर चित्रण आहे. या ग्रंथाचे तुकडे निनिव्हा येथील अश्यूरबनिपाल राजाच्या ग्रंथालयात मिळाले. सुमारे १२ मातीच्या पाट्यांवर ही कथा लिहिलेली होती. ती वाचताना हे स्पष्ट होतं की, त्या काळातही माणूस आत्मचिंतन करत होता, निसर्गाशी नातं जोडत होता आणि आयुष्याचा अर्थ शोधत होता.

जगातील पहिले साहित्यिक पुस्तक गिलगमेश महाकाव्यचा मातीच्या पाटीवर लिहिलेला काहीसा भाग
भारत आणि चीनमधील हस्तलिखित परंपरा
भारतात, लेखन परंपरेचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. ऋग्वेद, जो इ.स.पू. १५००-१००० च्या सुमारास रचला गेला, तो प्रारंभी तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केला गेला. नंतर ताडपत्रांवर आणि भुर्जपत्रांवर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. या ग्रंथांच्या संरचनेला ‘पुस्तक’ म्हणता येईल.
चीनमध्ये ‘I Ching’ (Book of Changes) हे अत्यंत प्राचीन पुस्तक मानले जाते. येथे बांबूच्या पट्ट्या दोऱ्यांनी जोडून ग्रंथ तयार केले जात. चिनी लोकांनी लिहिलेलं साहित्य शिस्तबद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या अत्यंत प्रगत होतं.

चिनी बांबू बुक
स्क्रॉल्सपासून ‘कोडेक्स’पर्यंत पुस्तकाचा बदलता अवतार
रोमन आणि ग्रीक संस्कृतीत पुस्तके स्क्रॉल्सच्या स्वरूपात होती. म्हणजे लांब कागदावर लिहून ते गुंडाळून ठेवले जात. कालांतराने याचं “Codex” या स्वरूपात रूपांतर झालं. म्हणजे आज आपण आजच्या पुस्तकात पाहतो, तसे पानं एकमेकांना शिवून ठेवलेली.
छपाई तंत्राने छापलेलं पहिले पुस्तक
जगातील पहिले छापील पुस्तक म्हणून ‘Diamond Sutra’ या बौद्ध धर्मग्रंथाची नोंद घेतली जाते. हे पुस्तक इ.स. ८६८ साली चीनमध्ये woodblock printing या तंत्राचा वापर करून छापले गेले. हे एक विशाल गुंडाळी (Scroll)असून याची लांबी तब्बल ५ मीटरपेक्षा अधिक आहे. यात बौद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आली आहे. आज हे पुस्तक ब्रिटिश म्युझियममध्ये सुरक्षित आहे.

डायमंड सुत्र पुस्तकातील एक भाग
साहित्य आणि समाज : एक आरसा
साहित्य हे केवळ कल्पनेचं जग नसतं, ते वास्तवाचं भाष्य असतं. साहित्यकार हे काळाचे भाष्यकार असतात. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपल्याला केवळ कल्पनाविलास देत नाहीत, तर सामाजिक जाणीवा जागवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘अनिहिलेशन ऑफ कास्ट’, महात्मा गांधींचं ‘सत्याचे प्रयोग’, सावित्रीबाई फुलेंचे विचार, प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, नागार्जुन, मंगलेश डबराल यांची साहित्यसंपदा, या सगळ्या पुस्तकांनी समाजाला दिशा दिली आहे.
आजही दलित साहित्य, स्त्रीवादी लेखन, आदिवासी अनुभवविश्व, LGBTQ+ लेखन या सर्व चळवळींनी समाजातील उपेक्षित आवाजांना पुस्तकांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. त्यामुळे पुस्तक केवळ एक वैयक्तिक अनुभव न राहता ते सामाजिक परिवर्तनाचं साधनही ठरतं.

आजच्या गतीमान आणि सतत बदलणाऱ्या जगात पुस्तकांशी असलेलं आपलं नातं जपणं ही काळाची गरज आहे. मोबाईलवर घालवलेला एक तास विसरणं सोपं असतं, पण चांगल्या पुस्तकातील एक विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुस्तकं माणसाला केवळ ज्ञानीच करत नाहीत, ती त्याला संवेदनशील, सहृदय आणि विवेकबुद्धीने युक्त बनवतात. आणि म्हणूनच पुस्तकाच्या पानांमधून उलगडणाऱ्या जगाला सामोरं जाणं हेच आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक विकासाचं खरे गमक आहे
डिजिटल युगात वाचन : आव्हान की संधी?
डिजिटल माध्यमांच्या उदयामुळे आज पुस्तकांच्या नव्या स्वरूपाचा उदय झाला आहे. ई-बुक्स, ऑडिओबुक्स, ऑनलाइन वाचन अॅप्स. या सगळ्यामुळे वाचनाची परिमाणं बदलली असली, तरी मूळ उद्देश तोच आहे शब्दांशी, विचारांशी नातं जोडणं. हेही मान्य करायला हवं की, नव्या पिढीला पुस्तकांकडे वळवण्यासाठी या नव्या माध्यमांचा उपयोग सकारात्मक पद्धतीने केला जाऊ शकतो. एका क्लिकवर हजारो पुस्तके मोबाईलमध्ये वाचता येत असतील, तर ती संधी म्हणून बघावी. पण त्यासाठी आधी वाचनाची गोडी लागावी लागते.

वाचन हा एक स्व-प्रेरित प्रवास आहे. तो केवळ परीक्षेसाठी किंवा उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी नसावा, तर स्वतःला समजून घेण्यासाठी, जगाला समजून घेण्यासाठी आणि अंतर्मुख होण्यासाठी असावा. म्हणूनच पुस्तकांचा उपयोग केवळ ज्ञानसंपादनापुरता मर्यादित न ठेवता, तो वैचारिक समृद्धीसाठी करणे आवश्यक आहे.
मराठी साहित्यातील गाजलेली १० पुस्तके
मराठी साहित्य अनेक रत्नांनी समृद्ध आहे. काळाच्या ओघात अनेक पुस्तके आली आणि गेली, पण काही पुस्तकांनी वाचकांच्या मनावर कायमची छाप सोडली. ही पुस्तके केवळ उत्तम लेखनशैली आणि कथांसाठीच नव्हे, तर त्यातील विचार, सामाजिक भाष्य आणि मानवी भावनांच्या प्रभावी चित्रणासाठीही ओळखली जातात. आजच्या जागतिक पुस्तक दिनाविषयी आपण अशाच काही गाजलेल्या १० पुस्तकांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
१. मृत्युंजय (शिवाजी सावंत) :
शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून साकारलेले ‘मृत्युंजय’ हे महाभारतातील दानशूर कर्ण याच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, ही केवळ चरित्रात्मक कादंबरी नाही, तर कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडणारी एक चिंतनशील कलाकृती आहे. सावंत यांनी कर्णाच्या जन्मापासून ते त्याच्या शोकांतिक अंतापर्यंतच्या प्रवासाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. त्याची निष्ठा, त्याग, अन्याय सहन करण्याची वृत्ती आणि त्याची मानवी बाजू वाचकांच्या मनाला स्पर्शून जाते. ‘मृत्युंजय’ कर्णाला एका नव्या रूपात उभा करते, ज्यामुळे वाचकाला त्याच्याबद्दल सहानुभूती आणि आदर निर्माण होतो. या कादंबरीची भाषा अतिशय प्रभावी आणि ओघवती आहे, जी वाचकाला खिळवून ठेवते.
२. ययाती आणि देवयानी (वि.स. खांडेकर) :
वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या कादंबरीत महाभारतकालीन ययाती राजा आणि शुक्राचार्यांची कन्या देवयानी यांच्या प्रेम आणि वासनेच्या गुंतागुंतीच्या संबंधांचे चित्रण आहे. खांडेकरांनी मानवी स्वभाव, प्रेम, वासना, कर्तव्य आणि नैतिकता यांसारख्या गहन विषयांवर या कथेतून प्रकाश टाकला आहे. ययातीची भोगवृत्ती आणि देवयानीची निष्ठा यांच्यातील संघर्ष वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतो. ही कादंबरी केवळ एका कथेपुरती मर्यादित न राहता, मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा शोध घेते. खांडेकरांची भाषा लालित्यपूर्ण आणि विचारगर्भ आहे.
३. बटाट्याची चाळ (पु.ल. देशपांडे) :
पु.ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या विनोदी आणि सामाजिक निरीक्षणाने परिपूर्ण असलेल्या ललित लेखांच्या संग्रहाने मराठी साहित्य आणि वाचकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. एका चाळीत राहणाऱ्या विविध स्वभावाच्या लोकांचे मजेदार आणि हृदयस्पर्शी चित्रण पु.ल.ंनी आपल्या खास शैलीत केले आहे. त्यांच्या विनोदी शैलीतून जीवनातील साध्या गोष्टींमधील आनंद आणि माणसांमधील संबंधांचे महत्त्व प्रभावीपणे समोर येते. ‘बटाट्याची चाळ’ केवळ हसवतेच नाही, तर त्यासोबतच मानवी स्वभावाचे आणि समाजाचे मार्मिक दर्शन घडवते.
४. कोसला (भालचंद्र नेमाडे) :
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही मराठीतील पहिली नवकथा म्हणून ओळखली जाते. या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर हा ग्रामीण भागातील एक तरुण आहे, जो शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. ‘कोसला’ पारंपरिक कादंबरीच्या चौकटीला आव्हान देते आणि एका व्यक्तीच्या आंतरिक संघर्षाला, त्याच्या नैराश्याला आणि समाजातील विसंगतीला थेटपणे मांडते. नेमाडे यांची भाषा ग्रामीण बोलीच्या जवळची आणि अत्यंत प्रभावी आहे. या कादंबरीने मराठी साहित्यात एक नवीन प्रवाह सुरू केला.
५. राधेय (रणजित देसाई) :
रणजित देसाई यांची ‘राधेय’ ही कादंबरी पुन्हा एकदा कर्णाच्या जीवनावर आधारित आहे, परंतु ती सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ पेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेते. देसाईंनी कर्णाच्या पराक्रमाला, त्याच्या दानशूरतेला आणि त्याच्या जीवनातील वेदनेला अधिक भावनात्मकतेने रंगवले आहे. राधेय म्हणजे सूर्याचा पुत्र असूनही त्याला समाजात मिळालेले दुय्यम स्थान आणि त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली खळबळ देसाईंच्या लेखणीतून प्रभावीपणे व्यक्त होते. ही कादंबरी वाचकाला कर्णाच्या संघर्षात सहभागी करते.
६. बनगरवाडी (व्यंकटेश माडगूळकर) :
व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीत एका दुष्काळी भागातील एका लहानशा गावाचे आणि तेथील लोकांच्या जीवनाचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. माडगूळकरांनी ग्रामीण जीवनातील साधेपणा, लोकांचे एकमेकांवरील अवलंबित्व आणि निसर्गाच्या कठोरतेपुढे त्यांची झुंज अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. शाळेतील शिक्षकाच्या दृष्टिकोनातून सांगितलेली ही कथा वाचकाला त्या भागातील संस्कृती, चालीरीती आणि लोकांच्या आशा-निराशांशी जोडते. ‘बनगरवाडी’ ग्रामीण जीवनातील वास्तवाचे आणि मानवी संबंधांच्या हळुवारतेचे सुंदर दर्शन घडवते.
७. छावा (शिवाजी सावंत) :
शिवाजी सावंत यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे ‘छावा’. ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. सावंत यांनी संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे दुःखद अंत यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले आहे. एका पराक्रमी योद्ध्याचे आणि विचारकाचे जीवन किती खडतर असू शकते, याचा अनुभव ‘छावा’ वाचताना येतो. सावंत यांची भाषा ऐतिहासिक वातावरणाला जिवंत करते आणि वाचकाला त्या काळात घेऊन जाते. संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनमोल पैलू या कादंबरीतून उलगडतात.
८. नाझी भस्मासुराचा उदय (वि.वा. शिरवाडकर) :
वि.वा. शिरवाडकर यांचे हे नाटक एका विशिष्ट ऐतिहासिक घटनेवर आधारित नसले तरी, ते सत्ता आणि अहंकार यांच्या अंधाऱ्या बाजूचे प्रभावी चित्रण करते. नाझी विचारसरणी आणि हिटलरच्या उदयोन्मुख हुकूमशाहीवर हे नाटक अप्रत्यक्षपणे भाष्य करते. शिरवाडकरांची भाषा नाट्यमय आणि विचारप्रवर्तक आहे. सत्तेच्या लोभापायी माणूस किती क्रूर आणि विनाशकारी होऊ शकतो, याचे हे नाटक अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.
९. पांगिरा (विश्वास पाटील) :
विश्वास पाटील यांची ‘पांगिरा’ ही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनावरील एक अत्यंत वेदनादायी आणि वास्तववादी कादंबरी आहे. पांगिरा म्हणजे जमिनीतील ओलावा. या ओलाव्यासाठी तळमळणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे दुःख, संघर्ष आणि आशा पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. निसर्गाची अवकृपा आणि शासकीय उदासीनता यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या सामान्य माणसांच्या जीवनाची ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते. ‘पांगिरा’ केवळ एक कादंबरी नसून, ती एक सामाजिक दस्तावेज आहे.
१०. युगंधर (शिवाजी सावंत) :
शिवाजी सावंत यांच्या ‘युगंधर’ या कादंबरीत भगवान कृष्णाच्या जीवनातील अंतिम पर्वाचे आणि त्यांच्या विचारधारेचे विश्लेषण आहे. कृष्णाचे तत्त्वज्ञान, त्यांचे मानवी रूप आणि त्यांच्या जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न सावंत यांनी प्रभावीपणे मांडले आहेत. ‘युगंधर’ कृष्णाला केवळ देव म्हणून न पाहता, एक विचारवंत आणि मार्गदर्शक म्हणून वाचकांसमोर उभे करते. जीवनातील सत्य आणि असत्य, धर्म आणि कर्म यांसारख्या गहन विषयांवर ही कादंबरी प्रकाश टाकते.