प्रवीण तांडेकर, (प्रतिनिधी) गोंदिया : गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीनं देशभरात डंका वाजवला आहे. या ग्रामपंचायतीनं पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पटकावला आहे. ग्रामीण विकासात मोलाची कामगिरी बजावणा-या ग्रामपंचायतींचा गौरव केला जातो. 2023-24 चे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले. यात राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यातली सडक अर्जुनी तालुक्यातली डव्वा ग्रामपंचायत देशात अव्वल ठरलीय आणि एक कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकलाय. पण हे यश कसं मिळवलं, यावर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी प्रकाश टाकला.
डव्वा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी म्हटले की, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी ‘कार्बन संतुलन’ संकल्पनेत ग्रामपंचायतीचा सहभाग होता. गावातल्या कार्बन संतुलनाबाबत 17 निकषांवर भर देण्यात आला. गावात अपारंपरिक ऊर्जेचा वापर, सौरऊर्जेबाबत जनजागृती, शासकीय इमारतींवर सौरऊर्जेसाठी पॅनल बसवणे, 19 सार्वजनिक इमारती आणि ग्रामपंचायतीत सोलारचा वापर, ई वाहनांच्या वापरावर भर, गावात सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारणी, गावातल्या कच-यापासून खतनिर्मिती, प्रत्येक घरासमोर झाडांची लागवड, कार्बन संतुलन राखण्यात यश येणं इत्यादी उपक्रमांमुळे कारणांमुळे ही डव्वा ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे.
हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी डव्वा ग्रामपंचायतीनं महिला सरपंचांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केलीय. तापमानवाढीचा मानवी आरोग्य आणि शेतीवर होणारा विपरीत परिणाम रोखायचा असेल तर आताच पावलं टाकणं गरजेचं आहे, हे ओळखून डव्वा ग्रामपंचायतीनं वेळीच काम सुरू केलंय. यासोबतच प्लास्टिकबंदी, फटाकेबंदी अभियानंही राबवलं जातं आहे. या सर्वकंष कामगिरीमुळे डव्वा ग्रामपंचायत अव्वल ठरलीये.