अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडगाव खाडे येथे एका वादात मध्यस्थी केल्याने एका युवकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. जखमी युवक प्रदीप इंगळे (३३) यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
.
घटनेची माहिती अशी की, गावातील रवी सरदार आणि शुभम इंगळे यांच्यात वाद झाला होता. प्रदीप इंगळे यांनी या वादात मध्यस्थी करून रवी सरदार यांची समजूत काढली आणि त्यांना घरी नेले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शुभम इंगळे प्रदीपच्या घराजवळ आला. त्याने प्रदीपला शिवीगाळ केली. प्रदीपने विचारणा केली असता शुभमने त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर कुऱ्हाडीने वार केले.
या प्रकरणी मीना सुनील इंगळे (३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभम इंगळे, त्याचे वडील श्रीकृष्ण इंगळे आणि इतर कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चारही आरोपी फरार आहेत.