अमरावतीपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये 35 हजार वर्षांपूर्वीच्या आदिमानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. पेटंटमॅन आणि इतिहासकार प्राचार्य डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.
.
मोर्शी नजीकच्या भोरकप येथील भिवकुंडी परिसरातील जंगलात या प्राचीन गुफा आढळल्या आहेत. या गुफांमध्ये कोरलेल्या चित्रांमधून आदिमानवांच्या जीवनाचा इतिहास समोर आला आहे. या भागात सुमारे ३५ हजार ते ३ हजार वर्षांपूर्वीपर्यंत आदिमानव वास्तव्याला होते.
इंटॅक संस्थेने जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. इंगोले यांनी या शोधाची सविस्तर माहिती दिली. या वेळी इंटॅकच्या जेष्ठ सभासद प्रा. डॉ. नेहा भटकर अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. जयंत वडतकर आणि तुषार वरणगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
३३ हून अधिक शोधांचे पेटंट असलेले डॉ. इंगोले यांनी या गुफांचा संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला. त्यांनी या वारसा स्थळाला शासनाने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. डॉ. वडतकर यांनी देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती देत त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन केले.
इंटॅकच्या अमरावती अध्यायातर्फे पुढील वर्षभरात जिल्ह्यातील वारसा स्थळांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे.