मोझरी येथील आंबेडकर नगरात एक अनपेक्षित घटना घडली आहे. घरगुती नळाच्या पाईपलाईनचे खोदकाम करताना दिवळ सापाची 40 पेक्षा जास्त पिल्ले आढळून आली. ही घटना शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
.
मोझरी ग्रामपंचायतीने पाण्याची टंचाई टाळण्यासाठी जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती आणि नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. विक्की वानखडे यांच्या घराजवळ खोदकाम करताना मजुरांना ही पिल्ले दिसली. स्थानिकांनी लगेच सर्पमित्र नासीर शेख यांना बोलावले.
नासीर शेख यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून सर्व पिल्लांचे रेस्क्यू केले. प्रत्येक पिल्लू 5 ते 7 इंच लांब होते. सर्पमित्रांनी या पिल्लांना सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडले. त्यांच्या मते ही पिल्ले सुमारे आठवड्यापूर्वी जन्मली असावीत.
सर्पमित्रांनी स्पष्ट केले की ही सर्व पिल्ले दिवळ प्रजातीची असून ते अजिबात विषारी नाहीत. सामान्यतः अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर साप ती जागा सोडून जातो. या प्रकरणातही असेच झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.