पातूर शहर व परिसरात वृक्षतोडीचा चिंताजनक तेवढाच संतापजनक प्रकार समोर येत आहे. आधी झाडांच्या मुळाशी जाणीवपूर्वक आग लावायची; झाड कोसळ्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली फांद्यांची विल्हेवाट लावयाची, असा प्रकार आहे. ही झाडे अत्यल्प दराने विकली जात
.


१८ एप्रिल रोजी दुपारी अकोला-वाशिम नव्या महामार्गावरील जुन्या गॅस गोडाऊन समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या निंबाच्या झाडाच्या मुळाशी आग लावण्यात आली. आग लागल्यामुळे झाडाचे बुंधा पूर्णतः जळाला आणि झाड थेट रस्त्यावर कोसळले. या ठिकाणावर कायम वर्दळ असते. ठिकाण , मात्र झाड कोसळताना सुदैवाने तेथे कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पातूर नगर परिषद अग्निशमन दलाचे सैय्यद अश्फाक आणि प्रल्हाद वानखडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणत रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र ही घटना अपघात नसून नियोजनबद्ध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
या वृक्षतोडीच्या नव्या प्रकारात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारांमुळे परिसरातील पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. झाडांच्या अभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, जमिनीची धूप वाढणे, हवामानातील असंतुलन आणि जैवविविधतेचा ऱ्हास हे परिणाम दिसून येत आहेत. भविष्यात याचे गंभीर दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतील. वृक्षतोडीच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
वृक्षतोड निसर्गाची हानी ^वृक्षतोड ही निसर्गाची अपरिमित होणारी हानी असून यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो. झाडे केवळ सौंदर्याचा नव्हे, तर जीवनाचा आधार आहेत. ती पावसाचे संतुलन राखतात, भूजल पातळी टिकवतात आणि उष्णता कमी करतात. नव्या महामार्गालगत जाणीवपूर्वक आग लावून झाडे पाडली जात आहेत, हा प्रकार गुन्हा असून याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. – ॲड. रूपाली राऊत, पर्यावरणप्रेमी, पातूर.