महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स(ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत भारताची अग्रगण्य मानांकित खेळाडू कोनेरु हम्पीने आपल्या उत्कृष्ट व्यूव्हरचना कौशल्याचे दर्शन घडवताना रशियाच्या पोलिना शुव
.
अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत चौथ्या फेरीत दुसऱ्या पटावरील पोलिना शुव्हालोवा विरुद्धच्या सामन्यात कोनेरु हम्पीने तिच्या आवडत्या पेट्रोफ बचावाने सामन्यास प्रारंभ केला नाही. त्यामुळे पोलिना काहीशी आश्चर्य चकित झाली. कोनेरुने इटालियन ओपनिंगने डावाची सुरुवात करताना आपल्या आक्रमक धोरणाची चुणूक दाखवली. चाचपडत खेळणाऱ्या पोलिनाने आठव्या चालीला प्यादे पुढे ढकलण्याची चूक केली. त्यामुळे कोनेरुने डावावर नियंत्रण मिळवले.
दोन्ही खेळाडूंनी बाराव्या चालीला वजीरा वजीरी केली. तसेच, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांची मोहरी नियमित अंतराने मारण्याचे धोरण अवलंबले. परंतु कमी वेळात अधिक चाली करणाऱ्या कोनेरुने लवकरच डावावर पकड घेतली. परस्परांना जोडलेली प्यादी आणि हत्ती यांनी सातव्या रांगेपर्यंत धडक मारल्यावर कोनेरुच्या विजयाची चिन्हे दिसू लागली होती. कोनेरुने 26व्या चालीला आपली प्यादी वजीर होण्याच्या मार्गावर असल्याचे दाखवून देताच पोलिनाला पराभवाची जाणीव झाली व 37व्या चालीला तिने शरणागती पत्करली. यावेळी कोनेरु म्हणाली की, हा विजय माझ्यासाठी फारसा कठीण नव्हता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तिसऱ्या पटावरील हरिका द्रोणावल्ली विरुद्ध वैशाली रमेशबाबू या दोन भारतीय खेळाडूंमधील लढत 34व्या चाली नंतर नियमानुसार बरोबरीत सुटली. वैशालीने हरिका विरुद्ध ग्रुनफेल्ड डिफेन्सने डावाचा प्रारंभ केला. मात्र हरिकाने लवकरच डावावर पकड घेतली आणि ती दीर्घकाळ टिकवली. तरीही वैशालीने पराभव टाळण्यासाठी भक्कम बचाव फळी उभारून कडवी झुंज दिली आणि हरिकाचे विजय मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. हरिका हिने अनेकदा वैशालीच्या राजाला शह दिल्यानंतर 34व्या चालीला पंचांनी डाव अनिर्णित जाहीर केला.
पहिल्या पटावरील भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश मिळालेल्या दिव्या देशमुख हिने मेलिया सॅलोम विरोध 70 चालीच्या प्रदीर्घ झुंजीनंतर विजयाची नोंद केली. या स्पर्धेतील दिव्याचा हा तिसरा विजय ठरला. दिव्याने मेलिया कॅरो कॅन डिफेन्स एक्सेंज व्हेरिएशन कल्पक वापर करताना संपूर्ण डावात वर्चस्व कायम राखले होते.