Mumbai Metro 8: नवी मुंबईकरांना मुंबईत येणे सोप्पे होणार आहे. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला जोडणारा एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रो मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या ३५ किमी लांबीच्या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
सिडकोने विविध टप्प्यात 25 मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहे. त्यापैकी बेलापूर ते पेंधरदरम्यान 11 किमी लांबीच्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 35 किमी असून यात 25.63 किमीचा उन्नत राहणार असून मुंबई विमानतळ ते छेडानगर दरम्यानचा 9.25 किमी लांबीचा मार्ग भूमिगत असणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत सध्या पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते पेंधर (मेट्रो मार्ग क्र. 1) मार्गावर नोव्हेंबर 2023 पासून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. बेलापूर येथून हा मार्ग 3.02 किमीने वाढवून तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्याची योजना आहे.
कशी असेल विमानतळ एक्स्प्रेस लाइन 35?
मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशी 11.1 किमी लांबीची मेट्रो लाइन 8 बांधण्यात येणार आहे. तर, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. तसंच, हा मार्ग भुयारी असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा लिंक रोडने उन्नत करण्यात येणार आहे.
30 मिनिटांत अंतर कापता येणार
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहतुकीच्या समस्येत वाढ होईल. नागरिकांनी वाहतूक कोंडीत अडकून बसू नये म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गामुळं मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर 30 मिनिटांत कापता येणार आहे. तसंच, या मार्गावर 7 स्थानके असणार आहेत. तसंच, या मार्गावर दर 20 ते 30 मिनिटांनी मेट्रो धावेल.