महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी सपत्नीक दाखल झाले आहेत. हा त्यांचा खासगी दौरा असला तरी ते नाराज आहेत का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासगी दौऱ्यावर गावी दाखल झाले आहेत. गुरुवारी (17 एप्रिल) दिवसभर कौटुंबिक कार्यक्रमात ते व्यस्त असणार असल्याचे कळतंय. शुक्रवारी (18 एप्रिल) त्यांच्या हस्ते ग्रामदैवताची विशेष पूजाही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावती एअरपोर्टचे गुरूवारी उद्घाटन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला गेले. सायंकाळी ते सपत्नीक हेलिकॉप्टरने तीन दिवसाच्या खाजगी दौऱ्यावर दरे गावी आले. नाराज असले की ते गावी येतात आणि राजकीय घडामोडींना वेग येतो. त्यामुळे ते नाराज आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरे गावी तीन दिवस त्यांचे धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पालकमंत्रीपदाचा वाद कायम
महायुतीमधील निधी वाटप, रायगड-नाशिकमधील पालकमंत्रिपदावरून तक्रार केल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे अचानक दरे गावात गेले आहेत. परंतु एका घरगुती कार्यक्रमासह ग्रामदैवताची पूजा करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरेंची भेट
दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक ते शिवतीर्थवर दाखल झाल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती, स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेटलो, असे शिंदेंकडून सांगण्यात आले. राजकीय चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. असे असले तरी आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची राजकीय झालर या भेटीमागे असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.