राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्या-टप्याने करण्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला असून शैक्षणिक वर्ष सन 2025-26 इयत्ता 1 ली पासून अंमलबजावणी सुरु होणार आहे.
.
राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 प्रमाणे नव्याने 5+3+3+4 असे स्तर तयार करण्यात आलेले आहेत. यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तरांऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात येणार आहेत. पायाभूत स्तर हा वय वर्षे 3 ते 8 या वयोगटात राहणार असून यामध्ये बालवाटिका 1, 2, 3 तसेच इयत्ता 1 ली व 2 री तुकडी असणार आहे. पूर्वतयारी स्तरामध्ये वय वर्षे 8 ते 11 राहणार असून यामध्ये इयत्ता 3 री, 4 थी व 5 वी तुकडी राहणार आहे. पूर्व माध्यमिक स्तर हा वय वर्षे 11 ते 14 वयोगटात राहील. यामध्ये इयत्ता 6 वी, 7 वी व 8 वी तुकडीचा समावेश असणार आहे. तर माध्यमिक स्तर हा वय वर्षे 14 ते 18 वयोगटात राहणार असून यामध्ये इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वीचा समावेश असणार आहे.
इयत्ता पहिलीची नवी पाठ्यपुस्तके 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहेत. तर 2026- 27 या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व सहावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील. त्यानंतर 2027- 28 या वर्षात पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असून आठवी, दहावी आणि बारावीची पाठ्यपुस्तके 2028-29 या शैक्षणिक वर्षात उपलब्ध होणार आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा अध्यादेशानुसार 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, नव्या अभ्यासक्रमासह शाळांचे वार्षिक वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे.
सद्यःस्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत. उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सुत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत.
भाषाविषयक धोरण
राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1 ली ते 5 वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6 वी ते 10 वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल.
पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके, महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण, इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे.
तसेच मूल्यमापन, अध्यापन पद्धती, वेळापत्रक, निरीक्षण व सनियंत्रण, शिक्षकांचे प्रशिक्षण, इ. सर्वांगीण बाबींमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात याव्यात.
बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख व विषय तज्ञ यांचा सहभाग असावा. सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी करावी. त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल.
अंमलबजावणी वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांची राहील.