Uddhav Thackeay Nashik Melava: उद्धव ठाकरे यांनी राजभवनात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याच्या उदयनराजे भोसले यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. आपणही याआधी ही मागणी केली होती अशी आठवण करुन देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांवर खरंच श्रद्धा असेल आणि त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवायचं नसेल तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा अशी मागणी केली आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. त्यावेळी ते बोलत होते.
“खरोखर महाराजांबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. मतांसाठी फक्त महाराजांचं नाव घेऊ नका,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. अरबी समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक कधी होणार? जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे. महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत. राज्यपाल पदावर तर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांना कशाला थाट पाहिजे. राजभवनाच्या जागी महाराजांचा इतिहास सांगणारं स्मारक उभं करा अशी शिवसेनेची मागणी आहे. राज्यपालांचा जनतेशी संबंध असतो किंवा नसतो. एका मंत्र्याकडे दोन तीन बंगले आहेत त्यापैकी त्यांना द्या. जगाला हेवा वाटेल असं स्माकर तिथे उभं करा आमचा पाठिंबा आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
“गुजरात्यांबद्दल राग नाही, पण जे दोघे तिथे बसले आहेत त्यांना महाराष्ट्राची कल्पना नाही. पंडित जवाहलालनेहरु नेहमी ओपन कारमधून फिरायचे. पण महाराष्ट्रात त्यांना बंद कारमधून फिरायला लागलं होतं. कोणाची मस्ती खपवून घेणारा महाराष्ट्र नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव घेणं कोणाला शोभतं. अमित शाह रायगडावर येऊन गेले, त्यांनी सांगितलं की महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. त्यांना माहिती नाही की, महाराजांच्या काळी लंडन गॅझेटमध्ये सूरत लुटीचती बातमी आली होती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
अमित शाह यांनी शिवाजी महाराजांवर 500 पानांचं पुस्तक लिहिलं आहे. ते वाचलं तर संजय राऊत यांना चक्कर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पण नंतर त्यांनाच चक्कर आली असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्याच कार्यक्रमात फडणवीसांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरुन फेकावं असं म्हणता म्हणता थांबले, पण नंतर लोकशाहीचा दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कऱणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. तरच महाराजांचं नाव घेऊ शकतो असंही ते म्हणाले.
“सत्ता असली की सगळे तिकडे जातात. सत्ता नसताना जे राहतात ते निष्ठावंत आणि सोबती असतात. सत्यनाराणयाची पूजा असली की तीर्थप्रसादाला सगळे जातात. पण छावे, मर्द, शिवरायाचंया मावळ्यांचे वारसादर माझ्यासोबत आहेत याचा आनंद आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्र खूप तापला आहे. ज्यावेळी अशा उन्हात सभा व्हायच्या तेव्हा बाळासाहेब म्हणायचे जमीन तापलीये आणि सूर्य आग ओकत आहेत पण ही डोकी अन्यायासाठी तापली आहेत की नाही हे महत्त्वाचं आहे. विचाराने किती तापले आहात हे महत्वाचं आहे. हे महाराष्ट्राचं भविष्य आणि दिशा ठरवणारं आहे. गद्दार हे ठरवू शकत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
“मी काँग्रेसच्या वतीने बोलत नाही आहे, पण नरेंद्र मोदींनी काँग्रेसने मुस्लीम अध्यक्ष करुन दाखवावा असं म्हटलं आहे. ते तुम्ही आणि त्यांनी काय ते पाहावं. पण असं असेल तर संघाने दलित सरसंघचालक करुन दाखवावा असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं आहे. संघाचे सरसंघचालक आणि काँग्रेसची यादी काढा आणि लोकांसमोर ठेवा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.