सातबारावर नावाची दुरुस्ती करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहायक महसूल अधिकारी सुनील होमराज लोणारे (वय ४५) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू आहे.
.
तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे केसलवाडा येथे प्लॉट असून त्यातील काही क्षेत्रफळाच्या प्लॉटची २०१७ मध्ये विक्री केली होती. परंतु, त्यावेळी चुकीने तक्रारदाराच्या पत्नीचे नाव सातबारा वरून कमी करण्यात येऊन अन्य व्यक्तीचे नाव सातबारावर चढविण्यात आले. सातबारावर चुकीने नाव वगळल्यामुळे त्यांनी पत्नीच्या नावाची नोंद सातबारावर होण्याकरिता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी केसलवाडा येथे तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. हा अर्ज पुढील कारवाईकरिता तलाठी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पाठविला आहे. त्या अर्जावरून दुरुस्तीसंदर्भात आदेश घेऊन सातबारावर योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी सहायक महसूल अधिकारी सुनील होमराज लोणारे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याबाबत ११ एप्रिल रोजी केलेल्या पडताळणीत त्यांनी ३००० रुपयांची पंचा समक्ष मागणी केली.
त्यावरून आज, मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई करून सुनील हेमराज लोहारे यांनी पंचा समक्ष स्वतःच्या कार्यालयात तीन हजार रुपये लाच स्वीकारली. त्यानतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले असून भंडारा पोलिस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेतली जात आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुण कुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, शिपाई विष्णू वरठी, नरेंद्र लाखडे यांनी केली.