राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचे काही नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाल
.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाढलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांना आजही दैवत मानतो असे विधान केले होते. तसेच बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चुलत्याच्या कृपेने आमचे सगळे चांगले सुरू असल्याचे ते म्हणाले होते. जय पवार यांच्या विवाहप्रसंगी देखील अजित पवारांनी शरद पवार यांचे खास स्वागत केले होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतही हे दोघे एकत्र दिसले. त्यात आता प्रफुल्ल पटेल यांनी दोघांबाबत मोठे विधान केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
नेमके काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले असतील आणि त्यातून पवार साहेबांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल तर, या दोघांच्या एकत्रित येण्यावर मला काही गैर वाटत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. अजितदादा विश्वस्त आहेत आणि पवार साहेब हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आलेत तर, त्यात आश्चर्याची गोष्ट नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर, त्यात काही चुकीचे नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचे नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
शिंदेंनी शहांकडे कुठलीही खंत व्यक्त केली नाही
आम्ही अमित शाह यांच्याकडे कुठलीही तक्रार केली नाही, खंत व्यक्त केली नाही. महायुतीचे सगळे नेते हजर होते. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही भेटलो. महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे चालवायची कशी याबाबतच आम्ही चिंतन केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे कुठलीही खंत व्यक्त केल्याच्या बाबीचा त्यांनी नकार दिला. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे कुठलीही खंत किंवा तक्रार केलेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर सुनील तटकरेंकडे जेवणासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे, मी एकत्र होतो. तेव्हा, अशा कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही, असेही ते म्हणाले.