Jyotiba Chaitra Yatra 2025 : दख्खनचा राजा अशी ख्याती असणा-या जोतीबा चैत्र यात्रा आनंदात पार पडली. जोतीबाला शासकीय अभिषेक आणि विधीवत रुपात पुजा बांधण्यात आली. यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटेपासुनच भक्तांच्या रांगा लागल्या. यावेळी मानाच्या सासनकाठ्यांची पारंपारीक वाद्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.
गुलालानं रंगलेलं मंदिर, खोब-यांची उधळण, उंचच उंच सासनकाठ्या आणि भाविकांचा जल्लोष जोतिबा गडावर पाहायला मिळाला. जोतीबाच्या नावानं चांगभलच्या गजरात जोतीबाची चैत्र यात्रा पार पडलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. पहाटे पाच वाजता जोतीबाला शासकीय अभिषेक घालण्यात आलाय. या यात्रेत महाराष्ट्रासोबतच, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो भाविक सहभागी झाले आणि ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ अशी जयघोषणेनं परिसर दुमदुमलाय.
गुढीपाडवा संपताच जोतिबा डोंगरावर यात्रेचा उत्साह दिसू लागतो, हलगी, पिपाणी आणि सनईच्या सुरांवर भाविकांनी सासनकाठ्या नाचवल्या. या यात्रेत 50 फूट लांबीच्या सासन काठ्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. दक्षिणेतील क्रूर दैत्यांचे निर्दालन करुन त्यांच्या जाचातुन जनसामान्यांना स्वतंत्र करणा-या राजाचा विजयध्वज म्हणुन या सासनकाठ्याकडं पाहिलं जातं.
कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा आनंदात संपन्न झाली. तमाम भक्तांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा हा उत्सव उत्साहात पार पडला. आपल्या सह बळीराजा, आणि सर्वांचंच भलं होऊ दे अशी प्रार्थना जोतिबाच्या चरणी करण्यात आली.