महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप 2025 आशिया ओशनिया गट 1 महिला टेनिस स्पर्धेत चौथ्या दिवशी सुहाना भारत संघाने चायनीज तैपेई संघाचा 2-1 असा पराभव करून सलग तिसऱ्या व
.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या दिवशी पहिल्या एकेरीच्या लढतीत भारताच्या जागतिक क्रमवारीत 364व्या स्थानी असलेल्या वैदेही चौधरी हिने चायनीज तैपेईच्या फॅंग अँन लीचा 6-2, 5-7, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून संघाचे खाते उघडले. हा सामना 2 तास 9मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये वैदेही हिने सुरेख खेळ करत तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये फॅंगची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकून आघाडी मिळवली.दुसऱ्या सेटमध्ये 5-5 अशी स्थिती असताना फॅंगने जोरदार कमबॅक करत दहाव्या व बाराव्या गेममध्ये वैदेहीची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 असा जिंकून बरोबरी साधली.तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये वैदेहीने आपला खेळ उंचावत फॅंगची पहिल्या व तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 3-1 अशी आघाडी मिळवली. पण फॅंगने सहाव्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व ही आघाडी 4-5 ने कमी केली.त्यानंतर वैदेही दहाव्या गेममध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती हिने चायनीज तैपेईच्या जोआना गारलँडचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(3) असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.हा सामना 1 तास 44मिनिटे चालला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या सर्व्हिस ब्रेक केल्या.त्यामुळे सामना 1-1 असा बरोबरीत होता. त्यानंतर पाचव्या गेममध्ये श्रीवल्लीने जोआनाची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवत हा सेट 6-2 असा जिंकला.दुसऱ्या सेटमध्येदेखील श्रीवल्लीने जोरदार खेळ करत तिसऱ्या गेममध्ये जोआनाची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 3-1 आघाडी मिळवली. पण त्यानंतर जोआनाने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत दहाव्या गेममध्ये श्रीवल्लीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 5-5अशी बरोबरी साधली.दोन्ही खेळाडूंनी 12 व्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये श्रीवल्लीने चतुराईने खेळ करत हा सेट 7-6(3) असा जिंकून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.दुहेरीच्या औपचारिक लढतीत चायनीज तैपेईच्या यी-सेन चाओ व फँग सीयन वू यांनी भारताच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा 6-2, 4-6, 10-6 असा पराभव केला.
