१० एप्रिल रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करीत जिल्हा परिषद मधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व कंत्राटी परिचर यांना ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
.
शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिवती आणि राजुरा तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणी पुरवठा संबंधी कामे जिवती येथील कंत्राटदाराने केले होते. १० गावातील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरी करिता सादर केले होते, त्यापैकी ५ गावातील कामांचे ४३ लक्ष रुपयांचे बिले कंत्राटदार यांना मिळाले. उर्वरित बिले मंजूर करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे यांनी ४ लक्ष रुपयांची लाच संबंधित कंत्राटदाराला मागितली.
लाचेची रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे देण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्याला ४ लक्ष रुपये मिळणार हि बाब गुंडावार यांना समजताच त्यांनी सुद्धा स्वतःसाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. दोन्ही अधिकाऱ्यांचे एकूण ४ लक्ष २० हजार रुपये द्यावे लागणार असे समजताच कंत्राटदार यांनी चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली.
तक्रार प्राप्त झाल्यावर ७ एप्रिल ते ९ एप्रिल रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. १० एप्रिल रोजी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी ४ लक्ष २० हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारत, लाचेच्या रकमेतील २० हजार रुपये स्वतःसाठी काढले आणि उर्वरित ४ लक्ष रुपये परिचर मतीन शेख यांच्याकडे देत साहेबांच्या घरी नेऊन द्या असे सांगितले. शेख यांनी सदर रक्कम कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या घरी नेऊन दिली असता त्यावेळी लाचलुचपत विभागाने हर्ष बोहरे, सुशील गुंडावार व मतीन शेख यांना रंगेहाथ अटक केली.
११ एप्रिल रोजी तिन्ही लोकसेवक विरोधात रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने तहसीलदार व तलाठी यांच्यावर कारवाई केली होती, महसूल नंतर मिनी मंत्रालयातील अधिकारी लाचखोरी मध्ये अडकल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी शिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, अमोल सिडाम, प्रवीण ताडाम, वैभव गाडगे, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम व संदीप कौरासे यांनी केली.