पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची परंपरा आता जगभरात पसरणार आहे. लंडनमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या निमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते लंडनपर्यंत जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.
.
ही दिंडी १६ एप्रिलला नागपुरात पोहोचणार आहे. संध्याकाळी ५ वाजता बजाज नगरमधील विष्णूजीकी रसोई येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही माहिती दिली. १८ एप्रिलला भारतातून निघणारी ही दिंडी नेपाळ, चीन, रशिया आणि युरोपसह २२ देशांतून प्रवास करणार आहे.
नागपूरचे विष्णू मनोहर आणि एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे मंदिर समितीचे सदस्य असून भारतातील समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. विष्णू मनोहर यांच्या मते, परदेशात इस्कॉन, अक्षरधाम आणि बालाजी मंदिरे आहेत, मात्र समृद्ध संत परंपरा असलेले विठ्ठल मंदिर नाही.
मोहन पांडे यांनी सांगितले की, पादुका थेट विमानाने नेता येणे शक्य असले तरी, वारकरी परंपरेप्रमाणे पायी प्रवास करण्याचे ठरवले आहे. दिंडी ७० दिवसांत १८ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या उपक्रमासाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि चैतन्य उत्पात यांनी सहकार्य केले आहे.