क्रिकेटपटू केदार जाधव याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव याने हा पक्षप्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. मंगळवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात
.
केदार जाधवचे भाजपमध्ये येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणारे आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुक समोर ठेवत भाजपने पक्ष वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच स्थानिक पातळीवर देखील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी देखील मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू झाला आहे. केदार जाधवने पक्षात प्रवेश केला असला तरी अद्याप त्याच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
काय म्हणाला केदार जाधव?
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केदार जाधव म्हणाला, 2014 ला केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, तेव्हापासून त्यांना देशातील नागरिकांकडून ज्या पद्धतीचे प्रेम मिळाले आहे, त्यांना जनतेचे जितके समर्थन मिळाले आहे, त्या समर्थनाच्या जोरावर त्यांनी देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. गेल्या कित्येक वर्षांत कुठल्याही सरकारला जे जमले नाही ते नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत करून दाखवले आहे.
पुढे बोलताना केदार जाधव म्हणाला, नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत देशाचा खूप विकास केला आहे. आता आपण विकसित भारताच्या दिशेने जात आहोत. मोदीनी जसा देशाचा विकास केला तसाच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास केला आहे. त्यांनी देखील अनेक मोठी कामे केली आहेत. आतापर्यंतच्या कित्येक सरकारांना जमले नाही ते केंद्रात नरेंद्र मोदी यांनी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे.
भाजपमध्ये प्रवेशाचे सांगितले कारण
केदार जाधव म्हणाला, मला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे काम पाहून खूप प्रेरणा मिळते. त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. माझे आता एकच ध्येय आहे, देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी जे काही करता येईल ते सगळे मला करायचे आहे. या प्रगतीसाठी नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे. माझ्यासारखे तरुण अशा एखाद्या नेतृत्वाच्या पाठी उभे राहतात. राज्याची व देशाची सेवा करण्यालायक बनतात. आपल्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपात ते नेतृत्व आहे. महाराष्ट्राकडे देवेंद्र फडणवीस आहेत.
केदार जाधवने त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी केली होती. मागच्या वर्षी जून महिन्यात त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या संदर्भातील माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. केदार जाधवने त्याचा अखेरचा सामना 2020 साली फेब्रुवारी महिन्यात न्यूझिलंडच्या विरोधात खेळला होता. आता त्याने राजकीय इनिंग सुरू केली असल्याचे दिसत आहे.
केदार जाधवचे क्रिकेट करिअर
केदार जाधव या मराठमोळ्या क्रिकेटपटूने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याचा पहिला एक दिवसीय सामना रांचीमध्ये श्रीलंकेच्या विरोधात खेळला होता. केदारने एकूण 73 एकदिवसीय सामन्यात 42.09 च्या सरासरीने एकूण 1389 धावा केल्या. केदार जाधवने एकदीवसीय सामन्यात दोन शतके तसेच सहा अर्धशतके केलेली आहेत. विशेष म्हणजे केदार जाधवच्या नावावर एकूण 27 बळी आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केदार जाधवने 123.23 च्या सरासरीने एकूण 58 धावा केलेल्या आहेत.