Raigad waghya samadhi : रायगडावर वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याचा मुद्दा आता प्रकर्षानं पुढे आणत छत्रपती घराण्याचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा काही महत्त्वाचे मुद्दे माध्यमांद्वारे प्रकाशात आणत सरकारपर्यंत पोहोचवले. यावेळी काही छायाचित्र सादर करत त्यांनी त्यांनी रायगडावरील वास्तव सर्वांपुढे आणलं. यावेळी लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या समितीचा संदर्भ त्यांनी दिला.
सदर समितीनं जिरणोद्धाराचं काम पूर्णत्वास नेलं ज्यासाठी पुरातत्वं खात्यानं 2000 रुपये दिले होते असी माहिती देत यामध्ये अनेक शिवभक्तांनी मदत करत 1926 ला हे स्मारक पूर्ण झालं होतं ही बाब त्यांनी मांडली. पण पुढे, 1936 ला हे स्मारक कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं स्मारक उभं राहिलं? असा थेट सवाल त्यांनी केला. यावर अनेक वादविवाद असून मुळा वादविवाद हा शब्दच इथं चुकीचा आहे. कारण सर रिचर्ड टेम्पल किंवा त्यांसारखे परदेशी अधिकारी असो, महाराष्ट्रातले इतिहासकार असो या वाघ्या कुत्र्याची कुठं एकही नोंद नाही याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. डाव्या, उजव्या विचारसणीचे इतिहासकार असो एकाहीनंही वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याची बाब सांगितली नाही असं म्हणत या समाधीसंदर्भात त्यांनी खदखद व्यक्त केली.
शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का?
एका दंतकथेचा संदर्भ देत या माध्यमातूनच ही वाघ्या कुत्र्याची समाधी जन्मास आली, हा गंभीर विषय त्यांनी यावेळी बोलून दाखवला. ”पुरावे नसतानाही असणारी ही समाधी पाहता मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी तेसुद्धा नाकारत नाही, कुत्रे असूही शकतात. त्याच्याबद्दल नाकारण्याचा विषयही नाही. पण, जी दंतकथा निर्माण झाली आहे ‘राजसंन्यास’च्या नाटकातून, एक अस नाटक ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली त्या दंतकथेतून वाघ्या कुत्रा प्रकट झाला आणि तिथं स्मारक बांधण्यात आलं”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
सर्व इतिहासकारांना बोलवा आणि…
वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा एकही पुरावा कुठेच पाहायला मिळत नसल्यानं सर्व इतिहासकारांना सरकारनं बोलवून विरोध करणाऱ्यांना आणि आपल्यालाही शासनानं तिथं बोलवावं आणि समोरासमोर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची उंची महाराजांच्या समाझीपेक्षाही उंच आहे हे कोणालाही पटेल का? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
होळकरांचा संदर्भ जोडणं म्हणजे दुर्दैव…
वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात होळकर घराण्याटा होणारा उल्लेख दुर्दैवी असल्याचंही संभाजीराजे म्हणाले. ‘दुर्दैवानं इथं इंदूरचे तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव पुढे केलं जात आहे की त्यांनी या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. ज्या हिंदवी स्वराज्यासाठी मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर यांनी सर्वस्व अर्पण केलं अशा वेळी तुकोजीराव महाराज कुत्र्याच्या स्मारकासाठी कशी मदत करतील? ते तर खरे शिवभक्त होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव हे जवळचे मित्र होते. महाराजांच्या पहिल्या चरित्रदग्रंथाच्या मराठी प्रती तुकोजीरावांनी स्वत: विकत घेत देशभरातील संग्रहालयात पोहोचवल्या. याच ग्रंथाचं इंग्रजीतील भाषांतरही त्यांनी करून घेतलं. हा चुकीचा इतिहास पुढे आणला जात आहे हे दुर्दैव आहे’, अशा शब्दांत त्यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला.
जातीचं राजकारण इथं नको…
समाधीच्या मुद्द्याला दिलं जाणारं जातीय वळण पाहता इथं हे राजकारण नको अशी स्पष्ट मागणी संभाजीराजेंनी केली. यावेळी धनगर समाजावरील विश्वासार्हता त्यांनी स्वानुभवातून व्यक्त केली. इथं कुठंही जातीचा विषय नसून, हे विषयाला बगल देण्याचं काम सुरू आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं स्थलांतर शक्य आहे, त्यामुळं विषयाला वेगळं वळण देणं ही खंत वाटणारी बाब असल्याचं ते म्हणाले.
तो अल्टीमेटम नाही, पण…
‘सरकारला मी 31 मे चा अल्टीमेटम दिलं नसून, हे राज्य शासनाचं धोरण असून 31 मे पर्यंत गडकोटकिल्ल्यांमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढण्याचे आदेश राज्य शासनानं दिले आहेत. त्यामुळं ज्या वाघ्या कुत्र्याचा 1 टक्कासुद्धा पुरावा नाही, सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे. कोणीही या समाधीविषयी काही म्हणणार नाही… त्यामुळं आता शासनानं समाधी काढावी अशीच मी पत्रातून विनंती केली आहे’ असं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं. हे स्मारक संवैधानिक पद्धतीनं काढत कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही असं आवाहन त्यांनी केलं. सर्वांना विश्वासात घेत ही कारवाई करावी असात पुनरूच्चार त्यांनी केला.