कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली गेली की, सर्व गोष्टी आपोआप होतात, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शासन दरबारी मुंडे या
.
मंत्री भरत गोगावले आज पंढरपूरमध्ये विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे सरकार अडचणीत येत असून, सरकार बदनाम होत आहे, असा प्रश्न केला होता. त्यावर ते म्हणाले, कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. एकदा मर्यादा ओलांडली की ते आपोआप होते. त्यांची नेतेमंडळीही काल-परवापासून बोलायला लागली आहे. मला असे वाटते की, अजित पवार, एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघेही एकत्र बसून यावर योग्य तो निर्णय घेतील.
राजीनाम्याचा दबाव कैकपटीने वाढला
भरत गोगावले यांच्या या विधानामुळे राज्य सरकार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेईल असे स्पष्ट झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे धनंजय मुंडे हे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेत. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला अटक झाली आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. यामुळे सरकारसह स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव कैकपटीने वाढला आहे.
अजित पवारांच्या विधानाने झाली कोंडी
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी यासंबंधी एक महत्त्वाचे विधान केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट संबंध अद्याप आढळलेला नाही, असा दावा ते करतात. पण यापूर्वी अनेक प्रकरणांत आरोप झाल्यानंतर माझ्यासह अनेकांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. त्यामुळे नैतिकता म्हणून मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा देऊ नये याबाबत त्यांनाच विचारा, असे मत अजित पवारांनी नाशिकमध्ये बोलताना व्यक्त केले होते. एकप्रकारे त्यांनी राजीनाम्याचा चेंडू मुंडे यांच्याच कोर्टात टोलावला होता. यामुळे धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी झाली आहे.
यावेळी अजित पवारांना धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत? असा प्रश्न केला असता त्यांनी हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडे यांनाच विचारा, त्यांचे म्हणणे आहे की, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कुणाला वाचवणार नाही. जनतेने कुणाला वाचवण्यासाठी आमचे 237 आमदार निवडून दिले नाहीत. आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यानुसार आम्ही चांगले काम करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले.