‘आम्ही मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आहे, तुमचा मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग आहे, तुम्हाला डिजिटल अटक केली आहे’, अशी भीती दाखवत सायबर चोरांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सोनोनेंना ११.९९ लाखाने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बेगमप
.
प्रशांत पंडितराव सोनोने (५२)हे भारतीय पुरातत्त्व विभागाचे सहायक अधीक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. त्या व्यक्तीने मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. मुंबई येथे ९ आॅगस्ट २०२४ रोजी रोजी तुमच्या एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरुन १ लाख ६८ हजार रुपयांचे ट्रांझेक्शन झाल्याचे सांगितले. त्यावेळी सोनोने यांनी तसा व्यवहार केला नसल्याचे सांगितले. मात्र आरोपीने फिर्यादीला आधारकार्ड क्रमांक विचारला, तो फिर्यादीने देताच आरोपीने तुमचे आधार कार्डावरुन कॅनरा बँकेच्या फ्रॉड केसमध्ये त्याचा गैरवापर झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला डिजिटल अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची फी म्हणून ९९ हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली.
७ डिसेंबरपासून सुरू झाली फसवणूक; आॅनलाइन पाठवावे लागले पैसे आरोपीने फिर्यादीला एक बँक खाते क्रमांक सांगत त्यावर ११ लाख रुपये आरटीजीएस करण्यास सांगितले. त्यानुसार सोनोने यांनी ९ डिसेंबर रोजी ११ लाख रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर पाठवले. त्यानंतर आरोपीने पुन्हा ११ व १२ डिसेंबर रोजी फिर्यादीला फोन करत ‘तुम्हाला किती कर्ज मिळेल? याबाबत बँकेत जाऊन माहिती घ्या आणि त्याबाबत आम्हाला माहिती द्या’ असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने बँकेतून माहिती घेतली असता बँकेने प्रॉपर्टीची संपूर्ण कागदपत्रे लागतील व त्यासाठी साधारण एक महिना कालावधी लागेल, असे सांगितले होते. ही सर्व माहिती फिर्यादीने आरोपीला सांगितली असता चोरट्यांनी मित्रांकडून दहा लाख रुपये उसने घेण्यास सांगितले. त्यावर फिर्यादी सोनोने यांना हा सर्व फसवणुकीचा प्रकार असावा, अशी शंका आल्याने त्यांनी १३ डिसेंबर रोजी येथील सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणा सहभाग असून डिजिटल अटक केल्याचे खोटे सांगत आरोपीने या प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी ११ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक शंकर डुकरे अधिक तपास करत आहेत.
जाब का विचारू नये?
सामान्य दुचाकीस्वार जेव्हा वाहतुकीचा नियम मोडतो. त्यावेळी वाहतूक कर्मचारी व वाहनधारकांमध्ये किरकोळ वाद होतात. आर्थिक दंडावरून मी वाहतुकीचा नियम मोडलाच नाही, असा प्रतिसवाल पोलिसांना करतो. या उलट सायबर चोर ज्यावेळी एखादे आरोप करतात. त्यावेळी नागरिक घाबरून का पैसे त्यांच्या अकाउंटवर टाकतात, असे एका विधिज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर सल्ला दिला आहे.
बातमीतून धड – जबाबदारी तुमचीही
पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला ईडी, सीबीआय, क्राइम ब्रँच आणि पोलिस असल्याचे सांगून धमकावत असेल तर तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या किंवा सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार करू शकता किंवा सायबर पोलिसांचा टोल फ्री क्रमांक १९३० वरही तक्रार करू शकता.